क्रिकेट हा एक असा खेळ आहे ज्यात खेळाडू कमालीचे फिट हवे असतात. मॉडर्न डे क्रिकेटमध्ये फिटनेसचे महत्त्व खूप वाढले आहे. विराट कोहली आणि एबी डिव्हिलियर्ससारख्या खेळाडूंनी फिटनेसची पातळी एका वेगळ्या उंचीवर नेली. जिममध्ये आजकाल सारेच खेळाडू घाम दिसतात. इच्छाशक्ती व्यतिरिक्त फिटनेस हीच अशी गोष्ट आहे, जी खेळाडूला कोणत्याही प्रकारच्या परिस्थितीसाठी तयार ठेवते. त्याचवेळी कोणत्याही खेळाचा एक भाग असतो ती म्हणजे दुखापत. खेळाडू कितीही फिट असला तरी एखादी दुखापत त्याच्यासाठी अत्यंत क्लेशकारक ठरते. कधीकधी दुखापतीने त्याचे करिअर धोक्यात येते. काही यातून सावरतात. मात्र, काहींना आपले करिअर या दुखापतीमुळे संपवावे लागते. आजच्या लेखामध्ये आपण अशाच खेळाडूंविषयी जाणून घेणार आहोत, ज्यांचे करिअर दुखापतीमुळे अकाली संपले.
मॉडर्न डे क्रिकेटमधील सर्वोत्तम ऑल राऊंडरपैकी एक खेळाडू म्हणजे इंग्लंडचा अँड्र्यू फ्लिंटॉफ. इंग्लंडचा सर्वात मोठा मॅचविनर म्हणून त्याची ओळख आहे. बॅट आणि बॉल या दोन्हीने तो नेहमीच संघाला अडचणीतून बाहेर काढत. मात्र, आपली दैदीप्यमान आंतरराष्ट्रीय कारकीर्द तो केवळ 11 वर्षांपर्यंत लांबवू शकला. तो संपूर्ण कारकिर्दीत सातत्याने दुखापतींनी हैराण राहिला. अखेर 2010 मध्ये त्याला त्याच्या अवघ्या 32 व्या वर्षी रिटायरमेंट घ्यावी लागली. या काळात त्याने त्याने इंग्लंडकडून 79 टेस्ट, 141 वनडे आणि 7 टी20 मॅचेस खेळल्या. 2005 मधील इंग्लंडच्या ऍशेस विजयाचा तो नायक होता. रिटायरमेंटनंतर त्याने बॉक्सर आणि टीव्ही प्रेझेंटर म्हणून करिअर बनवलं.
क्रिकेट इतिहासातील सर्वात यशस्वी विकेटकीपर म्हणजे दक्षिण आफ्रिकेचा मार्क बाऊचर. त्याने 15 वर्ष दक्षिण आफ्रिकेचे प्रतिनिधित्व केले. तिन्ही प्रकारच्या क्रिकेटमध्ये त्याने स्टम्प्समागे 999 विकेट्स घेतलेल्या. 36 वर्षांचा बाउचर आपल्या करीयरच्या शेवटाकडे आलेला मात्र, फिटनेसमूळे तो आणखी दोन वर्ष खेळण्याची शक्यता होती. 2012 मध्ये, दक्षिण आफ्रिका इंग्लंडविरुद्धच्या सीरिजपूर्वी सॉमरसेटविरुद्ध टूर गेम खेळत होती. त्या मॅचमध्ये इम्रान ताहीरने सॉमरसेटचा बॅटर गेमल हुसेनला बोल्ड केले आणि बिना हेल्मेट कीपिंग करत असलेल्या बाऊचरच्या डाव्या डोळ्यावर बेल्स लागली. या आघाताने त्याच्या बुबुळाला दुखापत झाली व शस्त्रक्रिया करावी लागली. मात्र, इथेच त्याचं करिअर संपुष्टात आलं.
मॉडर्न डे क्रिकेटमधील फास्टेस्ट बॉलर म्हणून ऑस्ट्रेलियाच्या शॉन टेटला ओळखले जाते. सातत्याने फास्ट बॉल टाकण्याची त्याची कला वादातील होती. त्याने आपल्या करिअरमधील 60 टक्के बॉल 150 किमी प्रतितास पेक्षा जास्त वेगाने टाकलेले. ऑस्ट्रेलियाने जिंकलेल्या 2007 वनडे वर्ल्डकप विजयात त्याचा सिंहाचा वाटा होता. मात्र, तो त्याचं इंटरनॅशनल करिअर जास्त लांबवू शकला नाही. याचं महत्त्वाचं कारण होतं, त्याची बॉलिंग एक्शन. फास्ट बॉलिंग करण्यासाठी त्याची बॉलिंग ॲक्शन त्याच्या संपूर्ण शरीराला ताण द्यायची. त्यामुळे त्याला अनेक दुखापतींना सामोरे जावे लागले. खांदा, घोटा, गुडघा अशा वेगवेगळ्या दुखापती त्याला झालेल्या. 2011 वर्ल्डकपनंतर अवघ्या 35 वनडे खेळून त्याने वनडे व टेस्ट क्रिकेटला रामराम ठोकला. त्यावेळी त्याचे वय अवघे 28 वर्ष होते. त्यानंतर तो काही दिवस टीममधून बाहेर गेला. 2016 मध्ये त्याने टी20 क्रिकेटमधून कमबॅक केला. मात्र, पुन्हा दुखापत झाल्याने त्याने थांबण्याचा निर्णय घेतला.
क्रिकेटचा जन्मदाता इंग्लंडने आपली पहिली आयसीसी ट्रॉफी 2010 टी20 वर्ल्डकपच्या रूपाने जिंकली. त्या वर्ल्डकपच्या फायनलमध्ये विजयाचा नायक होता विकेटकिपर क्रेग किस्वेटर. दक्षिण आफ्रिकेत जन्मलेला किस्वेटर इंग्लंडसाठी इंटरनॅशनल क्रिकेट खेळत होता. 46 वनडे व 25 टी20 खेळलेला किस्वेटर 2014 मध्ये तो काउंटी टीम सॉमरसेटसाठी होता. नॉर्दम्पटनशायरविरूद्ध बॅटिंग करत असताना एक बाऊंसर येऊन त्याच्या चेहऱ्यावर लागला. यात त्याच्या नाकाचे व गालाचे हाड मोडले. ही दुखापत बरी झाली मात्र त्याची दृष्टी अस्पष्ट झाली. यामुळे वयाच्या अवघ्या 26 व्या वर्षी त्याला क्रिकेटला अलविदा करावा लागला.
अकाली रिटायरमेंट घेणाऱ्या इंटरनॅशनल क्रिकेटर्समध्ये एक नाव आहे भारताच्या सबा करीम (Saba Karim) याचे. विकेटकीपर असलेला सबा भारतासाठी केवळ 1 टेस्ट आणि 34 वनडे खेळला. वयाच्या 32 व्या वर्षी करीयर फुलण्याआधीच त्याला खेळ सोडावा लागला. 2000 मध्ये ढाका येथे बांगलादेशविरुद्धच्या मॅचमध्ये विकेटकिपींग करताना अनिल कुंबळेच्या बॉलने त्याच्या डोळ्याला मार लागला होता. ऑपरेशन करत त्याने कमबॅक करण्याचा प्रयत्न केला. मात्र, हा कमबॅक यशस्वी झाला नाही.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
यशस्वी कर्णधाराचा विमान अपघात ते पाकिस्तानी कोचचा रहस्यमयी मृत्यू, वाचा क्रिकेटमधील न उलगडलेल्या घटना
क्रिकेटच्या 145 वर्षांच्या इतिहासातील दुर्मिळ योगायोग, भारतीयांनाही लावलाय नंबर; एका क्लिकवर घ्या जाणून