मुंबई। चेन्नई सुपर किंग्जचा (सीएसके) स्टार फलंदाज सुरेश रैना युएईमध्ये आयपीएल 2020 स्पर्धा न खेळताच मायदेशी परतला आहे. सोमवारी चेन्नई सुपर किंग्जचे मालक आणि बीसीसीआयचे माजी अध्यक्ष एन. श्रीनावासन यांनी यश कधी कधी डोक्यात जाते, असे विधान केले होते.
श्रीनिवासन यांच्या या विधानाने रैना नाराज झाला असून त्याचे चाहते देखील हैराण झाले आहेत. दरम्यान, प्रसारमाध्यमांनी विधानाचा विपर्यास केला असल्याचे श्रीनिवासन यांनी सांगितले.
श्रीनिवासन यांनी ‘टाइम्स ऑफ इंडिया’च्यासोबत या संपूर्ण विषयावर सविस्तर चर्चा केली आहे. ते म्हणाले, “चेन्नई सुपरकिंग्स फ्रँचायझीमध्ये रैनाचे योगदान क्रमांक दोन नंबरचे नाही. लोक गोष्टींचा चुकीचा अर्थ लावत आहेत. हे अत्यंत दुर्दैवी आहे.”
ते म्हणाले, ‘सीएसके फ्रँचायझीमध्ये त्यांचे वर्षानुवर्षे योगदान शानदार राहिले आहे. असे उत्कृष्ट योगदान अमूल्य आहे. रैना सध्या कोणत्या परिस्थितीतून जात आहे हे आम्हाला समजले पाहिजे आणि आम्ही त्याला वेळ दिला पाहिजे. ही फ्रॅन्चायझी नेहमी रैनाच्या पाठीशी उभी राहिली आहे आणि या कठीण दिवसांतही आमचा त्याला पूर्णपणे पाठिंबा आहे.”
आयपीएलच्या सुरूवातीपासून म्हणजेच 2008 पासून रैना चेन्नई सुपरकिंग्जचा एक भाग आहे. या काळात त्याने सर्वोत्कृष्ट कामगिरी केली आहे. कर्णधार एमएस धोनी यांच्यानंतर तो लीडरशिपमध्ये क्रमांक 2चा खेळाडू आहे.
रैनाची आयपीएलमधील कारकीर्द
आयपीएलमध्ये रैनाच्या नावावर 189 डावांमध्ये एक शतक आणि 38 अर्धशतकांसह 5 हजार 368 धावांचा समावेश आहे. रैनाचा स्ट्राइक रेट 137.14 आहे. आयपीएलचे १२ हंगाम मिळून सर्वाधिक धावा करणाऱ्या खेळाडूंमध्ये रैना दुसऱ्या स्थानावर आहे. याशिवाय आयपीएलमध्ये खेळल्या गेलेल्या काही हंगामात तो अव्वल क्रमांकाचा खेळाडूही राहिला आहे. या लीगमध्ये रैनाने एकूण193 सामने खेळले आहेत. धोनी (190 ) तो पेक्षा 3 सामने अधिक खेळला आहे.
नेमके काय होते प्रकरण?
दुबईला पोहोचल्यानंतर सीएसकेची टीम इथल्या ताज हॉटेलमध्ये थांबली होती आणि प्रोटोकॉलनुसार सर्व खेळाडूंनी स्वत: ला अलग केले होते. रैना दुबईतील हॉटेलच्या खोलीत क्वारंटाइनमध्ये होता. तेव्हा तो घाबरू लागला. अष्टपैलू रैनाकडे खोलीत चालण्यासाठी पुरेशी जागा नव्हती. त्याचा त्याला त्रास होऊ लागला. यानंतर रैनाने आयपीएलचा हा हंगाम सोडण्याचा निर्णय घेतला.