आयपीएल स्पर्धेच्या इतिहासात चेन्नई सुपर किंग्स संघ मुंबई इंडियन्स संघानंतर दुसरा सर्वात यशस्वी संघ आहे. परंतु, आयपीएल स्पर्धेच्या १३ व्या हंगामात चेन्नई सुपर किंग्स संघाला पहिल्यांदा प्लेऑफ गाठण्यात अपयश आले होते. या संघाने १४ सामने खेळले होते. ज्यामध्ये त्यांना अवघ्या ६ सामन्यात विजय मिळवण्यात यश आले होते.
त्यावेळी धोनीने म्हटले होते की, “आम्ही येणाऱ्या हंगामात जोरदार कामगिरी करू.” आणि या हंगामात त्यांनी करूनही दाखवले. सनरायझर्स हैदराबाद संघाविरुद्ध झालेल्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्स संघाने ६ गडी राखून विजय मिळवला आणि प्लेऑफमध्ये प्रवेश केला. या संघाने असे काय वेगळे केले ज्यामुळे हा संघ सर्वात आधी प्लेऑफमध्ये पोहोचला? याबाबत अधिक माहिती आपण या लेखात जाणून घेणार आहोत.
टॉप ऑर्डरसह चेन्नईचा मध्यक्रम मजबूत
या हंगामात चेन्नईच्या फलंदाजांनी अप्रतिम कामगिरी केली आहे. या हंगामात चेन्नईच्या फलंदाजांनी दुसऱ्या आणि पाचव्या गडी साठी १०० पेक्षा अधिक धावांची भागीदारी केली आहे. ऋतुराजने या हंगामात आतापर्यंत ११ सामन्यात ४०७ धावा केल्या आहेत. तर फाफ डू प्लेसिसने ११ सामन्यात ४३५ धावा केल्या आहेत. यासह मोईन अलीने २७८, अंबाती रायुडूने १९५, रवींद्र जडेजाने १७९ आणि सुरेश रैनाने १५७ धावा केल्या आहेत.
चेन्नईचे गोलंदाज सुपर हिट
चेन्नईच्या फलंदाजीसह गोलंदाजी देखील संतुलीत दिसून येत आहे. चेन्नईचे गोलंदाज सर्वाधिक गडी बाद करणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत टॉप ५ मध्ये नसले, तरी देखील त्यांनी संघाच्या विजयात मोलाचे योगदान दिले आहे. चेन्नईच्या शार्दुल ठाकूर, ड्वेन ब्रावो आणि दीपक चाहरने प्रत्येकी ११-११ गडी बाद केले आहेत. तर सॅम करनला ९ आणि रवींद्र जडेजाला ८ गडी बाद करण्यात यश आले आहे.
धोनीचे नेतृत्व चेन्नईच्या यशामागचे प्रमुख कारण
धोनीने आयपीएल २०२१ स्पर्धेत अप्रतिम नेतृत्व केले आहे. त्याने सुरुवातीच्या सामन्यापासून प्लेइंग ईलेव्हेनमध्ये जास्त बदल केले नाहीये. फक्त कोलकाता नाईट रायडर्स संघाविरुद्ध झालेल्या सामन्यात ड्वेन ब्रावोच्या जागी सॅम करनला संधी देण्यात आली होती. या व्यतिरिक्त संघात कुठलाही बदल करण्यात आला नाहीये. हेच प्रमुख कारण आहे की, चेन्नईच्या खेळाडूंना मनमोकळेपणे खेळता येत आहे.
तसेच धोनीने गोलंदाजांचा देखील योग्यरीत्या वापर केला आहे. त्याने योग्यवेळी योग्य गोलंदाजाला गोलंदाजी देऊन अचूक क्षेत्ररक्षण सजवले आहे. ज्यामुळे गोलंदाज फलंदाजांवर दबाव बनवण्यात यशस्वी ठरले.
महत्त्वाच्या बातम्या –
‘तुमच्या पाठीमागे कोण कसंय…’, म्हणत सनरायझर्सच्या डगआऊटमध्येही स्थान न मिळाल्याने हळहळला वॉर्नर
दिनेश कार्तिकचा बोलघेवडेपणा, अश्विन-मॉर्गन वाद चिघळण्यास ठरला कारणीभूत, सेहवागचा आरोप






