काल झालेल्या आयपीएलच्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्जने रॉयल चॅलेंजर्स बंगलोरला धूळ चारली. एकतर्फी झालेल्या या सामन्यात पहिल्या डावात चेन्नईने १९१ धावा केल्या होत्या. ज्याचा पाठलाग करतांना बंगलोरला फक्त १२२ धावा करता आल्या. त्यामुळे चेन्नईने ६९ धावांनी विजय मिळवत पॉईंट्स टेबल मध्ये देखील अव्वल स्थानी झेप घेतली.
चेन्नईच्या या विजयात रवींद्र जडेजाच्या अष्टपैलू कामगिरीचा मोलाचा वाटा होता. विशेषतः फलंदाजीत पाचव्या क्रमांकावर येत त्याने झळकावलेल्या अर्धशतकामुळे चेन्नईला आव्हानात्मक धावसंख्या उभारणे शक्य झाले. आता सामन्यानंतर चेन्नईचा कर्णधार एमएस धोनीने जडेजाला फलंदाजीत बढती देण्यामागील कारणाचा खुलासा केला आहे.
धोनीच्या आधी फलंदाजीला आला जडेजा
अष्टपैलू रवींद्र जडेजा साधारण सहाव्या अथवा सातव्या क्रमांकावर फलंदाजी करत असतो. मात्र बंगलोर विरूद्धच्या सामन्यात जडेजा पाचव्या क्रमांकावरच फलंदाजीला आला होता. १४२व्या षटकांत फॅफ ड्यू प्लेसिस बाद झाल्यावर तो फलंदाजीला उतरला. कर्णधार एमएस धोनीच्या आधी त्याला फलंदाजीला आलेले पाहून अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. मात्र आता खुद्द धोनीनेच यामागील कारणाचा उलगडा केला आहे.
याबाबत सामन्यांनंतर बोलतांना धोनी म्हणाला, “जडेजाकडे एकट्याच्या बळावर सामन्याचे चित्र पालटण्याची क्षमता आहे. मागील काही वर्षांत त्याच्या फलंदाजीत खूप सुधारणा झाली आहे. त्यामुळे त्याच्याकडून सर्वोत्तम कामगिरी काढून घेण्यासाठी त्याला अधिक वेळ आणि अधिक चेंडू देणेच योग्य आहे. म्हणूनच त्याला आम्ही फलंदाजी क्रमात बढती दिली.”
जडेजाने केले संधीची सोने
दरम्यान, जडेजाने देखील या संधीचा पुरेपूर लाभ उठवला. सावध सुरुवातीनंतर त्याने आक्रमक फटकेबाजी करत चेन्नईला १९१ धावांपर्यंत पोहोचवले. त्याने २८ चेंडूत नाबाद ६२ धावांची खेळी केली. जडेजाने या सामन्यात नंतर गोलंदाजीत देखील योगदान देत ३ बळी घेतले. या सामन्यात भारतीय अष्टपैलू कामगिरीसाठी त्यालाच सामनावीराचा पुरस्कार देण्यात आला.
महत्वाच्या बातम्या:
खेळाडूंच्या माघारीने आयपीएलचे आयोजन धोक्यात? बीसीसीआयने दिले स्पष्टीकरण
Video: मुंबईला रामराम ठोकत धोनी आणि कंपनीची दिल्लीकडे कूच; या संघाबरोबर होणार सामने