इंडियन प्रीमियर लीग २०२२ हंगाम अखेरच्या टप्प्यात येऊन ठेपला आहे. अशात गतविजेत्या चेन्नई सुपर किंग्सला मोठा धक्का बसला. त्यांचा अनुभवी अष्टपैलू क्रिकेटपटू रविंद्र जडेजा उर्वरित आयपीएल २०२२ हंगामातून दुखापतीमुळे बाहेर झाला आहे. पण, त्याच्या बाहेर होण्याने आणखी एका चर्चेला तोंड फुटले आहे. सध्या जडेजा आणि चेन्नई फ्रँचायझी यांच्यात काहीतरी बिनसल्याची चर्चा जोर धरत आहे.
जडेजा-चेन्नई बिनसलं?
आयपीएल २०२२ (IPL 2022) सुरू होण्यापूर्वी चेन्नई सुपर किंग्सने (Chennai Super Kings) जडेजाला (Ravindra Jadeja) कर्णधार केले होते. कारण, हंगाम सुरू होण्यापूर्वी एमएस धोनीने (MS Dhoni) नेतृत्वपदाचा राजीनामा देण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे जडेजाने या आयपीएल हंगामात पहिल्या ८ सामन्यात चेन्नई सुपर किंग्सचे नेतृत्व केले. पण, त्याच्या नेतृत्वाखाली चेन्नईला फार काही खास करता आले नाही. या ८ सामन्यांपैकी चेन्नईने केवळ २ सामने जिंकले. तसेच जडेजाची वैयक्तिक कामगिरी देखील सुमार राहिली.
त्याचमुळे जडेजाने ८ सामन्यांनंतर आपल्या डोक्यावरील कर्णधारपदाचा मुकूट बाजूला सारत वैयक्तिक कामगिरीवर लक्ष देण्याला प्राधान्य दिले. पण, यानंतर लगेचच तो दुखापतग्रस्त झाला आणि स्पर्धेतून आता बाहेर झाला आहे.
या दरम्यान अशा बातम्या समोर आल्या की, जडेजा आणि चेन्नई फ्रँचायझीने एकमेकांना सोशल मीडियावर अनफॉलो (Unfollow on Social Media) केले आहे. त्यामुळे जडेजा आणि चेन्नई फ्रँचायझी यांच्यात काही वाद असल्याचे कयास लावले जात आहेत. विशेष म्हणजे जडेजाला चेन्नईने आयपीएल २०२२ साठी पहिली पसंती म्हणून १६ कोटी रुपयांत संघात कायम केले होते.
सीइओंचे स्पष्टीकरण
चेन्नई सुपर किंग्सचे सीईओ कासी विश्वनाथन (Kasi Viswanathan) यांनी जडेजाबरोबर वाद असल्याच्या चर्चांबद्दल स्पष्टीकरण दिले आहे. त्यांनी सांगितले की, ‘सोशल मीडिया, मी यातील काही फॉलो करत नाही, मला त्याबद्दल काहीच माहित नाही. मी फक्त एवढे सांगू शकतो की, जडेजा चेन्नई सुपर किंग्सच्या भविष्यातील योजनेमध्ये नेहमीच कायम राहिल.’
जडेजाची कामगिरी
जडेजासाठी आयपीएल २०२२ हंगाम विसरण्यासारखा राहिला. कारण चेन्नई संघ त्याच्या नेतृत्वाखाली ८ पैकी केवळ २ सामने जिंकू शकले. तसेच त्याची वैयक्तिक कामगिरीही फारशी बरी झाली नाही. त्याने आयपीएल २०२२ मध्ये १० सामने खेळले असून ११६ धावा केल्या आहेत. तसेच ५ विकेट्स घेतल्या आहेत.
त्याला रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरविरुद्ध ४ मे रोजी सामना खेळताना क्षेत्ररक्षणावेळी बरगड्यांची दुखापत (A Rib Injury) झाली होती. त्यानंतर तो रविवारी (८ मे) झालेल्या चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स सामन्याला देखील मुकला होता. आता या दुखापतीमुळे तो उर्वरित स्पर्धेतूनही बाहेर गेला असल्याचे चेन्नई सुपर किंग्सकडून सांगण्यात आले आहे.
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी लिंकवर क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या –
आजच्याच दिवशी सीएसकेला धुळ चारत मुंबई इंडियन्स ठरली होती आयपीएलमधील सर्वात यशस्वी टीम
मुंबई इंडियन्सकडून खेळण्यासाठी स्वत:च्या राष्ट्रीय संघाला नकार देणारा ‘कायरन पोलार्ड’
Video: नागरकोटी बनला ‘सुपरमॅन’, डाईव्ह मारक पडकला पडीक्कलचा अवघड कॅच