जगातील सर्वात मोठी व्यावसायिक टी२० लीग असलेल्या इंडियन प्रीमियर लीगच्या पुढील हंगामाची तयारी सुरू झाली आहे. आठही संघांनी आपले रिटेन केलेले खेळाडू जाहीर केले आहेत. आतापर्यंत चार वेळा आयपीएल विजेते राहिलेल्या चेन्नई सुपर किंग्सनेही आपले चार खेळाडू रिटेन केले. संघाने विदेशी खेळाडूच्या स्वरूपात इंग्लंडचा अष्टपैलू मोईन अलीला स्थान दिले. दक्षिण आफ्रिकेचा सलामीवीर फाफ डू प्लेसिसला चेन्नईने कायम न केल्यामुळे आश्चर्य व्यक्त केले जात आहे. मात्र, आता चेन्नई संघ व्यवस्थापनाकडून याबाबतची महत्वाची माहिती दिली गेली आहे.
धोनीसह हे खेळाडू झाले रिटेन
चेन्नईने २०२२ आयपीएलसाठी आपल्या चार प्रमुख खेळाडूंना रिटेन केले. प्रमुख अष्टपैलू रवींद्र जडेजा याला १६ कोटी रुपये देत पहिल्या क्रमांकाचा खेळाडू म्हणून निवडले गेले. कर्णधार एमएस धोनीला १२ कोटीत रुपयात दुसऱ्या क्रमांकाचा, इंग्लंडचा अष्टपैलू मोईन अलीला ८ कोटींसह तिसऱ्या व युवा सलामीवीर तसेच मागील हंगामाचा ऑरेंज कॅप विजेता ऋतुराज गायकवाड याला सहा कोटींसह चौथ्या क्रमांकाचा खेळाडू म्हणून रिटेन केले गेले.
प्लेसिस पुन्हा खेळणार चेन्नईसाठी
चेन्नई संघाचे मुख्य कार्यकारी अधिकारी काशी विश्वनाथ यांनी एका चर्चेदरम्यान फाफ डू प्लेसिसबाबत एक महत्त्वपूर्ण विधान केले. ते म्हणाले,
“प्लेसिसला करारमुक्त करणे सोपे नव्हते. त्याने आम्हाला दोन वेळा विजेतेपद मिळवून देण्यात महत्त्वाची भूमिका निभावली आहे. मात्र, काही कारणाने आम्ही त्याला कायम करू शकलो नाही. परंतु, लिलावाद्वारे आम्ही त्याला पुन्हा संघात घेऊ इच्छितो. त्यासाठी पूर्ण प्रयत्न केला जाईल. अखेरीस, आता आमच्या हातात तितकेसे काही राहिले नाही.”
प्लेसिस गेली अनेक वर्ष चेन्नई संघाचा भाग आहे. सलामीवीर म्हणून त्याने चेन्नईसाठी नेहमीच शानदार कामगिरी बजावली होती. मागील हंगामातील ऑरेंज कॅप विजेत्या ऋतुराज गायकवाड याच्यापेक्षा तो केवळ दोन धावांनी मागे होता.
चेन्नईने केले बडे खेळाडू करारमुक्त
आयपीएल रिटेंशन नियमानुसार केवळ चार खेळाडूंना संघात कायम करण्याची मुभा देण्यात आली होती. या नियमाचा चेन्नईला फटका बसला. चेन्नई संघातील अनेक दिग्गज खेळाडूंना यामुळे मेगा लिलावात उतरावे लागेल. यामध्ये प्लेसिससह दिग्गज अष्टपैलू ड्वेन ब्राव्हो, अंबाती रायुडू, सॅम करन, जोस हेजलवूड, दीपक चहर व शार्दुल ठाकूर यांचा समावेश आहे. चेन्नईने याच खेळाडूंच्या कामगिरीच्या जोरावर मागील वर्षी आयपीएलचे विजेतेपद पटकावले होते.
महत्त्वाच्या बातम्या-
टीम इंडियाचा दक्षिण आफ्रिका दौरा ‘तळ्यात-मळ्यात’; ‘हे’ आहे कारण
“सीएसकेच रैनावर पहिली बोली लावणार”; संघसहकार्याने व्यक्त केला आशावाद