मुंबई। इंडियन प्रीमीयर लीग २०२२ हंगामात रविवारी (१५ मे) ६२ वा सामना झाला. हा सामना मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध गुजरात टायटन्स संघात पार पडला. दुपारी पार पडलेल्या या सामन्यात गुजरातने ७ विकेट्सने सहज विजय मिळवला. गुजरातचा हा या आयपीएल हंगामातील १० वा विजय होता. त्यामुळे त्यांनी २० गुणांसह आता गुणतालिकेतील पहिल्या दोन स्थानांपैकी एक स्थान पक्के केले आहे. मात्र, चेन्नई सुपर किंग्सने या पराभवाबरोबरच एक नकोसा विक्रम केला आहे.
चेन्नईचा नकोसा विक्रम
चेन्नईचा (Chennai Super Kings) या आयपीएल हंगामातील (IPL 2022) हा ९ वा पराभव होता. त्यामुळे एका आयपीएल हंगामात ९ पराभव पत्करण्याची ही चेन्नईची पहिलीच वेळ आहे. त्यांनी यापूर्वी २०२० साली झालेल्या आयपीएल हंगामात ८ पराभव पत्करले होते. पण, २०२२ सालच्या हंगामात चेन्नईची त्यापेक्षाही खराब कामगिरी झाली आहे. चेन्नईला आयपीएलच्या १५ व्या हंगामात १३ सामन्यांपैकी आत्तापर्यंत केवळ ४ सामने जिंकता आले आहेत. सध्या चेन्नई गुणतालिकेत ९ व्या क्रमांकावर आहे.
तसेच चेन्नईचे २०२२ च्या हंगामातील प्लेऑफला पोहचण्यासाठीचे आव्हान यापूर्वीच संपुष्टात आले आहे. चेन्नईची प्लेऑफला न पोहचण्याची ही केवळ दुसरी वेळ आहे. यापूर्वी २०२० मध्ये चेन्नई पहिल्यांदा प्लेऑफ गाठण्यात अपयशी ठरले होते.
गुजरातचा विक्रमी विजय
चेन्नईने जरी नकोसा विक्रम केला असला, तरी गुजरातने (Gujarat Titans) या आयपीएल हंगामात केलेल्या कामगिरीने सर्वांची मने जिंकली आहेत. त्यांनी १३ सामन्यांतील १० सामने जिंकले आहेत. विशेष म्हणजे गुजरातचा हा पहिलाच आयपीएल हंगाम आहे. त्यामुळे पहिल्याच आयपीएल हंगामात सर्वाधिक साखळी सामने जिंकणाऱ्या संघांच्या यादीत गुजरातने स्थान मिळवले असून आता त्यांना साखळी फेरीतील अखेरच्या सामन्यात राजस्थान रॉयल्सच्या विक्रमाची बरोबरी करण्याची संधी असणार आहे.
राजस्थानने २००८ साली १४ साखळी सामन्यांपैकी ११ सामने जिंकले होते. तसेच पंजाब किंग्सने (तेव्हाची किंग्स इलेव्हन पंजाब) २००८ साली १० सामने जिंकले होते, तर २०१३ साली पहिला आयपीएल हंगाम खेळणाऱ्या सनरायझर्स हैदराबादने देखील १४ पैकी १० सामने जिंकले होते.
रविवारी झालेल्या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना चेन्नई सुपर किंग्सला २० षटकात ५ बाद १३३ धावा करता आल्या होत्या. त्यानंतर १३४ धावांच्या आव्हानाचा पाठलाग गुजरातने ३ विकेट्स गमावत १९.१ षटकात पूर्ण केला.
महत्त्वाच्या बातम्या –
जयस्वालने असा काही षटकार मारला की, पंचांना मागवावा लागला नवा चेंडू, पाहा Video
अखेर ‘ती’ एक ट्राॅफी जिंकल्यावर क्रिकेटजगताने इंग्लंडची थांबवली होती थट्टा मस्करी
Video: ओव्हरस्मार्ट बनायला निघालेल्या जोस बटलरची फजिती, आवेश खानने केले क्लिन बोल्ड