आयपीएल २०२१ हंगामाला ९ एप्रिलपासून सुरुवात झाली. या हंगामातील दुसरा सामना आज (१० एप्रिल) चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स यांच्यादरम्यान होत आहे. या सामन्यात दिल्लीने नाणेफेक जिंकत चेन्नईला प्रथम फलंदाजीसाठी निमंत्रित केले. चेन्नईकडून सुरेश रैनाने अर्धशतक करत धमाकेदार पुनरागमन केले. मात्र, चांगल्या फॉर्ममध्ये दिसत असताना तो दुर्दैवीरित्या धावबाद होऊन माघारी परतला.
रैनाचे धमाकेदार पुनरागमन
मि. आयपीएल या नावाने ओळखला जाणारा चेन्नई सुपर किंग्सचा अनुभवी फलंदाज सुरेश रैना या सामन्यातून आयपीएलमध्ये पुनरागमन करत आहे. रैनाने वैयक्तिक कारणास्तव युएई येथे झालेल्या आयपीएलच्या तेराव्या हंगामातून माघार घेतली होती. त्यानंतर तो कोणत्याही प्रकारचे स्पर्धात्मक क्रिकेट खेळला नव्हता.
या सामन्यात ७ धावांवर दोन्ही सलामीवीर गमावल्यानंतर रैना तिसऱ्या षटकात फलंदाजीसाठी आला. मोईन अली आक्रमक फलंदाजी करत असताना त्याने एक बाजू लावून धरली. त्याने आपल्या पहिल्या २२ चेंडूत २५ धावा बनविल्या होत्या. मात्र, त्यानंतर अवघ्या १४ चेंडूत २९ धावा लुटल्या. त्याने ३६ चेंडूत ३ चौकार व ४ षटकारांच्या सहाय्याने ५४ धावा फटकावल्या.
दुर्देवरित्या झाला धावबाद
चांगल्या फॉर्ममध्ये दिसत असलेला रैना अत्यंत निराशाजनक पद्धतीने धावबाद झाला. चेन्नईच्या डावातील सोळावे षटक युवा वेगवान गोलंदाज आवेश खान टाकण्यासाठी आला. पहिल्या चेंडूला सामोरा जात असलेल्या रवींद्र जडेजाने हा चेंडू स्क्वेअर लेगच्या दिशेने तटवला. दोघांनी एक धाव यशस्वीरीत्या पूर्ण केली. जडेजा दुसरी धाव घेण्यासाठी धावला असता गोलंदाज आवेश खानला धडकला व पुढे धावू शकला नाही. तोपर्यंत रैना अर्ध्यापेक्षा जास्त खेळपट्टीच्या पुढे आला होता. ही संधी साधत शिखर धवनने चेंडू यष्टीरक्षक रिषभ पंतकडे फेकला व रैना धावबाद झाला.
Suresh Raina runout #Csk #DC #IPL2021 #SureshRaina #raina pic.twitter.com/Lcv63BPo1r
— Ankush Dhavre (@AnkushDhavre) April 10, 2021
चेन्नईचा धावांचा डोंगर
नाणेफेक गमावल्यानंतर चेन्नईची सुरुवात अत्यंत खराब झाली. ऋतुराज गायकवाड व फाफ डू प्लेसीस सात धावांमध्ये माघारी परतले. त्यानंतर मोईन अलीने ३६ धावांची तुफानी खेळी केली. अंबाती रायडूने २३ धावांचे योगदान दिले. रैनाने सर्वाधिक ५४ धावा केल्या. सॅम करन व रवींद्र जडेजा यांनी अखेरपर्यंत नाबाद राहत अनुक्रमे ३४ व २६ धावा बनविल्या. चेन्नईने या सर्वांच्या योगदानामुळे ७ बाद १८८ धावत धावा उभारल्या. दिल्लीसाठी ख्रिस वोक्स व आवेश खान यांनी प्रत्येकी दोन बळी मिळवले.
महत्त्वाच्या बातम्या –
‘मिस्टर आयपीएल’ सुरेश रैनाचे दमदार पुनरागमन! पहिल्याच सामन्यात अर्धशतकासह विराट, रोहितची केली बरोबरी
एमएस धोनीच्या चेन्नई विरुद्ध मैदानात उतरताच ‘कर्णधार’ रिषभ पंतच्या नावावर ‘मोठा’ विक्रम