जगातील सर्वात मोठी व्यवसायिक टी२० लीग असलेल्या इंडियन प्रीमियर लीगचा (आयपीएल २०२२) आगामी हंगाम २६ मार्चपासून खेळला जाणार. कोरोनापासून खबरदारी म्हणून या वर्षी स्पर्धेचे सर्व सामने मुंबई व पुणे येथील चार वेगवेगळ्या मैदानांवर होतील. आयपीएलच्या या हंगामाचे वेळापत्रक नुकतेच जाहीर करण्यात आले. यावर्षी पुन्हा एकदा चेन्नई सुपर किंग्स (Chennai Super Kings) संघाला पहिल्या सामन्यात खेळण्याची संधी मिळाली आहे.
पहिल्या सामन्यावर चेन्नईचे वर्चस्व
आयपीएलच्या इतिहासात सर्वाधिक वेळा पहिला सामना खेळण्याची संधी चेन्नई सुपर किंग्स संघाला मिळाली आहे. आयपीएल २०२२ चा पहिला सामना पकडून चेन्नई संघ पंधरापैकी ७ हंगामात हंगामातील पहिला सामना खेळणार आहे. यावर्षी ते आपला पहिला सामना मागील वर्षी अंतिम फेरीत पराभूत झालेल्या कोलकाता नाईट रायडर्स संघाशी खेळतील. चेन्नईने कोलकाता संघाला पराभूत करत आपले चौथे विजेतेपद पटकावले होते.
चेन्नईने २००९ आयपीएलमध्ये पहिल्यांदा हंगामातील पहिला सामना खेळला होता. त्यावेळी त्यांचा सामना मुंबई इंडियन्स संघाशी झालेला. त्यानंतर २०११ व २०१२ मते त्यांनी अनुक्रमे कोलकाता व मुंबईविरुद्ध हंगामाची सुरुवात केली. यानंतर २०१८,२०१९ व २०२० अशी सलग तीन वर्षे त्यांना पहिला सामना खेळण्याची संधी मिळाली. त्यानंतर आता पुन्हा २०२२ मध्ये ते हंगामातील पहिला सामना खेळतील. चेन्नईने आतापर्यंत ४ वेळा जगातील या सर्वात कठीण स्पर्धेचे विजेतेपद मिळवले.
मुंबईत-पुणे येथे होणार आगामी आयपीएल
कोरोनामूळे यावर्षी स्पर्धा मुंबई येथील वानखेडे स्टेडियम, डी वाय पाटील स्टेडियम व ब्रेबॉर्न स्टेडियम येथे खेळली जाईल. तसेच, पुणे येथील महाराष्ट्र क्रिकेट स्टेडियमच्या स्टेडियमवर देखील सामने खेळवले जाणार आहेत. २६ मार्चपासून चेन्नई सुपर किंग्स व कोलकाता नाईट रायडर्स या संघांमध्ये पहिला सामना होऊ शकतो. यावर्षी गुजरात टायटन्स व लखनऊ सुपरजायंट्स हे दोन नवे संघ स्पर्धेत सहभागी झाल्याने स्पर्धा दोन गटात खेळली जाईल. स्पर्धेचे प्ले ऑफ सामने अहमदाबाद येथे होण्याची शक्यता आहे. याबाबत अधिकृत घोषणा लवकरच होऊ शकते.
महत्वाच्या बातम्या-
दोन आठवडे दारूच्या थेंबालाही नव्हतं शिवलं; शेन वॉर्नच्या निधनानंतर मॅनेजरचा दावा (mahasports.in)