भारतीय संघाचा माजी कर्णधार एमएस धोनीचे चाहते जगभरात आहेत. धोनी आपल्या स्वभावामुळे ‘कॅप्टन कूल’ म्हणून प्रसिद्ध आहे. तो दबावाच्या परिस्थितीतही शांत राहून सामन्याचा निकाल आपल्या बाजूने वळवण्याचा प्रयत्न करतो. धोनी हा अजूनही तरुण खेळाडूंसाठी आदर्श आहे. आयपीएलमध्ये चेन्नई सुपर किंग्सच्या तरुण खेळाडूंना त्याचा सल्ला नेहमीच फायदेशीर ठरतो. चेन्नई सुपर किंग्सचा युवा वेगवान गोलंदाज मुकेश चौधरीनेही धोनीकडून महत्त्वाचा सल्ला घेतल्याचे आता सांगितले आहे.
आयपीएल गाजवलेल्या मुकेशने आपल्या पहिल्या हंगामातील आठवणींना उजाळा दिला. चेन्नई सुपर किंग्स डॉट कॉमशी बोलताना म्हणाला,
“मी कधीही चेन्नई सुपर किंग्सकडून खेळेन असे वाटले नव्हते. जेव्हा मी पहिल्यांदा टीम बसमध्ये चढलो तेव्हा धोनीने माझ्या खांद्यावर थोपटले. मला विश्वास बसेना की हे माझ्यासोबत होत आहे. मला खूप अभिमान वाटला. माझ्या पहिल्या दोन सामन्यांमध्ये मी माझ्या क्षमतेनुसार सर्वोत्तम कामगिरी केली नाही. त्यामुळे मी एमएस धोनीशी रोज बोलायचो आणि सामन्यातही आमची चर्चा व्हायची. धोनीने मला माझ्या क्षमतेवर विश्वास ठेवण्यास सांगितले. ऋतुराज माझा मित्र आहे. त्यामुळे तो नेहमी माझ्यासोबत असतो. तो मला आधार देतो. तुम्हाला फक्त स्वतःवर विश्वास ठेवण्याची गरज आहे. कारण सर्व खेळाडूंना कठीण काळातून जावे लागते.”
तो पुढे बोलताना म्हणाला,
“मुंबई इंडियन्स विरुद्धच्या सामन्याने मला आत्मविश्वास मिळाला. तेथूनच मी आणखी चांगली गोलंदाजी करण्याचा प्रयत्न केला.”
महाराष्ट्रासाठी देशांतर्गत क्रिकेट खेळणाऱ्या मुकेशने आयपीएल २०२२ मधून पदार्पण केले. या पहिल्याच हंगामात त्याने १३ सामन्यात १६ बळी आपल्या नावे केले होते. त्याने दीपक चहरची जागा घेत अशी कामगिरी करून दाखवलेली.
महत्त्वाच्या बातम्या-
कॅप्टन रोहित होणार आणखीनच हीट! दोन वेळच्या विश्वविजेत्या कर्णधाराला टाकणार मागे
माजी क्रिकेटरचा भारताच्या संघ निवडकर्त्यालाच दम! म्हणाला, ‘टी२० विश्वचषकासाठी योग्य टीम निवड’
रविंद्र जडेजामुळे ‘या’ खेळाडूची कारकीर्द संपण्याच्या मार्गावर, धोनीसारखा आहे फिनिशर