बुधवारी (दि. 18 ऑक्टोबर) चेन्नईमध्ये विश्वचषक 2023 स्पर्धेचा 16वा सामना गत-उपविजेत्या न्यूझीलंड विरुद्ध अफगाणिस्तान संघात पार पडला. इंग्लंडला पराभूत केल्यानंतर अफगाणिस्तानचा आत्मविश्वास गगनाला भिडला होता. मात्र, न्यूझीलंडने या सामन्यात त्यांना 149 धावांनी दारुण पराभवाचा धक्का दिला. या विजयामुळे न्यूझीलंडने इतिहास रचला. हा न्यूझीलंडचा विश्वचषकाच्या इतिहासातील दुसरा सर्वात मोठा विजय ठरला.
या सामन्यात न्यूझीलंड (New Zealand) संघ नाणेफेक गमावत प्रथम फलंदाजीला उतरला होता. यावेळी त्यांनी निर्धारित 50 षटकात 6 विकेट्स गमावत 288 धावा केल्या. या आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी उतरलेल्या अफगाणिस्तान (Afghanistan) संघाचा डाव 34.4 षटकात 139 धावांवर पत्त्यांच्या बंगल्याप्रमाणे कोसळला. त्यामुळे न्यूझीलंडने हा सामना 149 धावांनी जिंकला. हा त्यांचा विश्वचषक 2023 (World Cup 2023) स्पर्धेतील सलग चौथा विजय ठरला. या विजयामुळे त्यांनी पुन्हा एकदा पॉईंट्स टेबलमध्ये अव्वलस्थान काबीज केले.
विश्वचषकातील दुसरा मोठा विजय
न्यूझीलंडसाठी हा विजय खास ठरला. वनडे विश्वचषकाच्या इतिहासात धावांच्या बाबतीत न्यूझीलंड संघाने मिळवलेला हा दुसरा सर्वात मोठा विजय ठरला. विश्वचषकात न्यूझीलंडने धावांच्या बाबतीत सर्वात मोठा विजय हा 1975मध्ये बर्मिंघम येथे मिळवला होता. यावेळी त्यांनी पूर्व आफ्रिका संघाला 181 धावांनी मात दिली होती. अशात अफगाणिस्तानला 149 धावांनी पराभूत करत त्यांनी वनडे विश्वचषक इतिहासातील दुसरा मोठा विजय मिळवण्याची कामगिरी केली.
न्यूझीलंड संघाने 2007 वनडे विश्वचषकात केनिया संघाला 148 धावांच्या अंतराने पराभूत केले होते. हा विश्वचषकाच्या इतिहासात धावांच्या बाबतीत त्यांचा तिसरा मोठा विजय ठरला. तसेच, 2015मध्ये वेलिंग्टन येथे न्यूझीलंडने वेस्ट इंडिजला 143 धावांनी नमवले होते. हा न्यूझीलंडचा विश्वचषकाच्या इतिहासातील धावांच्या बाबतीत चौथा मोठा विजय आहे.
आता न्यूझीलंडपुढे रविवारी (दि. 22 ऑक्टोबर) भारतीय संघाचे आव्हान आहे. या सामन्यात काट्याची टक्कर पाहायला मिळेल. (cwc 2023 Tom Latham lead team new zealand register second biggest win world cup history by 149 runs nz vs afg)
हेही वाचा-
पुण्याच्या मैदानात नेहमीच चमकलाय अश्विन, पण बांगलादेशविरुद्ध मिळणार नाही संधी; माजी क्रिकेटरचे विधान
भारतात पाकिस्तानी खेळाडूंशी होतोय वाईट व्यवहार? कर्णधारासह प्रमुख खेळाडूंनी स्वत:च सांगितलं- व्हिडिओ