कोलकाताच्या इडन गार्डन्स मैदानावर पाकिस्तान संघाने बांगलादेशविरुद्ध रोमहर्षक विजय मिळवला. विश्वचषक 2023 स्पर्धेतील 31व्या सामन्यात मंगळवारी (दि. 31 ऑक्टोबर) पाकिस्तान 7 विकेट्सने विजयी झाला. हा पाकिस्तानचा स्पर्धेतील तिसरा विजय ठरला. दुसरीकडे, बांगलादेश स्पर्धेतून बाहेर होणारा पहिला संघ ठरला. या दणदणीत विजयानंतर पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम याने मोठी प्रतिक्रिया दिली. यावेळी बाबर आझमने फखर जमानचे कौतुक केले.
या सामन्यात बांगलादेश संघाने नाणेफेक जिंकत फलंदाजीचा निर्णय घेतला होता. यावेळी बांगलादेशने 45.1 षटकात सर्व विकेट्स गमावत 204 धावा केल्या. या आव्हानाचा पाठलाग करताना पाकिस्तान संघाने 32.3 षटकातच 3 विकेट्स गमावत 205 धावा केल्या. तसेच, सामना 7 विकेट्सने खिशात घातला. पाकिस्तानकडून यावेळी फखर जमान (Fakhar Zaman) चमकला. त्याने 74 चेंडूत 81 धावांची खेळी केली. यामध्ये 3 चौकार आणि 7 षटकारांचा समावेश होता. या कामगिरीसाठी त्याला सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आले.
पाकिस्तानने या विजयासह उपांत्य फेरीत पोहोचण्याच्या आपल्या आशा जिवंत ठेवल्या आहेत. पाकिस्तान संघाचा कर्णधार बाबर आझम (Babar Azam) याने सामन्यानंतर जमानचे कौतुक केले. फखरला इमाम उल हक याच्या जागी संघात स्थान देण्यात आले होते.
काय म्हणाला बाबर?
सामन्यानंतर बाबर म्हणाला, “आम्ही तिन्ही विभागात ज्याप्रकारचे प्रदर्शन केले, त्याचे श्रेय सर्व खेळाडूंना जाते. आम्हाला माहिती होते की, जर फखर जमान क्रीजवर टिकला, तर सामन्याची स्थिती वेगळी असेल आणि असेच घडले. त्याने आपला नैसर्गिक खेळ खेळला. त्याला असे खेळताना पाहून चांगले वाटले.”
पुढे बोलताना बाबर असेही म्हणाला, “आम्ही आमचे पुढील दोन्ही सामने जिंकण्याचा प्रयत्न करू. आम्ही पाहू की आम्ही कुठे उभे आहोत. आम्ही चांगली सुरुवात केली. शाहीन आफ्रिदीने गोलंदाजीत शानदार सुरुवात केली. 15-20 षटकांनंतर बांगलादेशने एक भागीदारी केली होती. मात्र, आमच्या प्रमुख गोलंदाजांनी विकेट्स घेतल्या. आम्ही मधल्या षटकांमध्ये विकेट्स घेतल्या. चाहत्यांचे धन्यवाद, ज्यांनी आम्हाला पाठिंबा दिला.”
पाकिस्तानचा तिसरा विजय
खरं तर, हा पाकिस्तान संघाचा विश्वचषक 2023 (World Cup 2023) स्पर्धेतील तिसरा विजय आहे. यासह पाकिस्तान स्पर्धेच्या पॉईंट्स टेबलमध्ये पाचव्या स्थानी पोहोचला. तसेच, बांगलादेश संघ उपांत्य फेरीच्या शर्यतीतून अधिकृतरीत्या बाहेर पडला. त्यांचे 7 सामन्यात 2 गुण असून ते टेबलमध्ये नवव्या स्थानी आहेत. (cwc 23 pakistan skipper babar azam praise fakhar zaman for superb knock against bangladesh pak vs ban read here)
हेही वाचा-
कीवींना धक्का! दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यातूनही दिग्गज बाहेर, अधिकृत माहिती आली समोर
सेमी-फायनलची जागा पक्की करण्यासाठी न्यूझीलंड-द.आफ्रिकेत झुंज! पुण्यात रंगणार ‘रन’युद्ध