गोल्ड कोस्ट। ऑस्ट्रेलियात सुरु असलेल्या राष्ट्रकुल स्पर्धेत भारताला आज बॅडमिंटनमध्ये महिला दुहेरीत कांस्यपदक मिळाले आहे. सिक्की रेड्डी आणि अश्विनी पोनप्पा या भारतीय महिला जोडीने हे पदक भारताला मिळवून दिले आहे.
सिक्की आणि अश्विनी या जोडीने आज कांस्यपदकाच्या लढतीत ऑस्ट्रेलियाच्या सेत्यना मपासा आणि ग्रोन्य सोमरवील या जोडीला पराभूत केले. सिक्की आणि अश्विनीने ४७ मिनिटे चाललेल्या या सामन्यात २१-१९, २१-१९ अशा फरकाने विजय मिळवून कांस्यपदक आपल्या नावावर केले.
याआधी उपांत्य सामन्यात सिक्की आणि अश्विनीला आज सकाळीच मलेशियाच्या मेई कुआन चाओ आणि विवियन हो या जोडीने पराभूत केले होते. त्यामुळे या भारतीय महिला जोडीला सुवर्णपदकाच्या शर्यतीतून बाहेर पडावे लागले.
पण या पराभवानंतरही त्यांना कांस्यपदक मिळवण्याची संधी होती आणि याच संधीचा फायदा घेत सिक्की आणि अश्विनीने कांस्यपदक मिळवले.
आतापर्यंत भारताला बॅडमिंटनमध्ये २ पदके मिळाली आहेत. यात भारताने सांघिक प्रकारात बॅडमिंटनचे सुवर्णपदक मिळवले आहे.