गोल्ड कोस्ट। ऑस्ट्रेलीयात सुरु असलेल्या २१ व्या राष्ट्रकुल स्पर्धेत भारताचा स्टार बॅडमिंटनपटू किदांबी श्रीकांतने रौप्यपदक मिळवले आहे. त्याने बॅडमिंटनच्या पुरुष एकेरीत ही कामगिरी केली.
आज त्याला अंतिम सामन्यात मलेशियाच्या ली चॉन्ग वेईने २१-१९,१४-२१,१४-२१ अशा फरकाने तीन सेटमध्ये पराभूत केले. या पराभवामुळे श्रीकांतला रौप्य पदकावर समाधान मानावे लागले आहे.
१ तास ५ मिनिट चाललेल्या या लढतीत श्रीकांतने पहिल्या सेटमध्ये विजय मिळवला होता. पण त्याला ही आघाडी कायम राखण्यात अपयश आले.
पहिला सेट गमावल्यानंतर चॉन्ग वेईने अनुभवाच्या जोरावर दुसऱ्या सेटमध्ये पुनरागमन करत श्रीकांतला टक्कर दिली आणि हा सेट जिंकून सामना बरोबरीचा केला. यामुळे ही लढत तिसऱ्या आणि निर्णायक सेटमध्ये गेली. तिसऱ्या सेटमध्येही ऑलिम्पिक रौप्य पदक विजेत्या चॉन्ग वेईने वर्चस्व ठेवले होते. त्याने श्रीकांतला स्थिर होण्याची संधी न देता हा निर्णायक सेटही आपल्या नावावर केला आणि राष्ट्रकुल स्पर्धेतील एकेरीचे तिसरे सुवर्णपदक जिंकले.
याआधी श्रीकांतने मिश्र सांघिक स्पर्धेत मलेशिया विरुद्ध अंतिम फेरीच्या एकेरी लढतीत चॉन्ग वेईवर मात केली होती. तसेच श्रीकांतने त्यावेळी कारकिर्दीत पहिल्यांतच चॉन्ग वेईवर विजय मिळवला होता. पण आज मात्र त्याला तशी कामगिरी करण्यात अपयश आले.
श्रीकांतचे हे राष्ट्रकुलमधील दुसरे पदक आहे. त्याला मिश्र सांघिकचे सुवर्णपदक मिळाले आहे. श्रीकांत २०१४ मधेही राष्ट्रकुल स्पर्धेत सहभागी झाला होता. पण त्याला यात पदक मिळविण्यात अपयश आले होते.
त्यानंतर मात्र त्याने त्याची कामगिरी कमालीची उंचावली आहे. त्याने मागील वर्षी ४ सुपरसिरीजचे विजेतीपदे मिळवली होती. तसेच तो दोन दिवसांपूर्वीच जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानी विराजमानही झाला आहे.