प्रो कबड्डी लीगच्या आठव्या हंगामात ८१ वा सामना गुजरात जायंट्स व दबंग दिल्ली या संघांमध्ये खेळला गेला. नवीन कुमारच्या अनुपस्थितीत खेळणाऱ्या दिल्ली संघाने जबरदस्त सांघिक खेळ करत गुजरातला पराभूत करून पहिल्या स्थानावर झेप घेतली.
सामन्याची सुरुवात दिल्ली संघाने अत्यंत आक्रमक केली. त्यांनी सलग चार गुण घेत गुजरातवर दबाव आणण्याचा प्रयत्न केला. चांगल्या सुरुवातीनंतर त्यांनी खेळामध्ये आपले सातत्य टिकवून ठेवले. आशू मलिक व विजय मलिक यांनी रेडींगमध्ये अप्रतिम कामगिरी बजावली. दोघांनी अनुक्रमे ६ व ७ गुण घेतले. तर, डिफेन्समध्ये सर्वांनी गुणांच्या योगदान दिले. गुजरातसाठी राकेश नरवाल व प्रदीप यांनी प्रत्येकी तीन गुण कमावले. पहिल्या हाफच्या अखेरीस दिल्लीकडे २२-११ अशी मोठी आघाडी होती.
दुसऱ्या हाफमध्ये दिल्ली संघाने पहिल्या हाफमधील खेळ कायम ठेवला. दुसऱ्या हाफमध्ये संघाच्या डिफेन्सने कमाल केली. मनजित छिल्लर, जोगिंदर नरवाल व जीवा कुमार या अनुभवी खेळाडूंना युवा किशन धूलने हाय फाईव पूर्ण करत साथ दिली. दिल्ली संघाने सामन्यावर असे वर्चस्व निर्माण केले की त्यांची आघाडी एकदाही १० पेक्षा कमी गुणांची आली नाही. दिल्लीच्या डिफेन्सने तब्बल १७ गुण मिळवले. दिल्लीने या सामन्यात अखेरीच्या ४१-२२ असा विजय मिळविला.