क्रिकेटमध्ये असे अनेक खेळाडू होते, ज्यांना महान म्हणून संबोधले गेले. ज्यांनी आपल्या कौशल्याच्या आधारे क्रिकेटला एक वेगळीच उंची प्राप्त करून दिली. क्रिकेटमधील कित्येक अशा संघांमध्ये अनेक महान खेळाडू होऊन गेले. यातीलच एक नाव म्हणजे दक्षिण आफ्रिकेचा महान वेगवान गोलंदाज डेल स्टेन. मंगळवारी (३१ ऑगस्ट) डेल स्टेनने क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती घेतली.
स्टेनने तब्बल १७ वर्ष क्रिकेटसाठी वाहिले. या गोलंदाजाच्या कारकिर्दीत अनेक फलंदाज या खेळाडूच्या गोलंदाजीची भीती बाळगून असायचे. स्टेनने त्याच्या कारकीर्दीत तब्बल ६९९ विकेट्स घेतल्या होत्या. ज्यामध्ये त्याने कसोटीत ४३५ विकेट्स घेतल्या होत्या. तर एकदिवसीय क्रिकेटमध्ये १९६ विकेट्स घेतल्या होत्या, आणि ६४ विकेट्स त्याने टी-२० मध्ये देखील घेतल्या होत्या.
स्टेन त्याच्या गोलंदाजीतील वेगासाठी आणि स्विंगसाठी ओळखला जायचा. स्टेनने आपल्या गोलंदाजीच्या जोरावर अनेक वेळा दक्षिण आफ्रिका संघाला विजय मिळवून देण्यात मोलाची भूमिका निभावली होती.
आपल्या कारकीर्दीत यशाच्या शिखरावर असणाऱ्या डेल स्टेनचे जीवन नेहमी पासूनच असे नव्हते. डेल स्टेनचे बालपण खूप गरिबीमध्ये गेले होते. त्याचा जन्म एका गरीब कुटुंबात झाला होता. त्याचे कुटुंब एवढे गरीब होते की, त्याला त्याच्यासाठी बूट विकत घ्यायला देखील पैसे नसायचे. आज आपण त्याच महान गोलंदाजा बद्दल जाणून घेणार आहोत.
डेल स्टेनने सर्वाधिक वेळा ९ कसोटी संघांविरुद्ध एका डावात ५ विकेट्स घेण्याचा कारनामा केला आहे. या गोलंदाजाचे महान असण्याचे कारण म्हणजे डेल स्टेन त्याच्या कारकिर्दीत तब्बल २३४३ दिवसांपर्यंत जगातील अव्वल क्रमांकाचा गोलंदाज होता. जे की, आजही एक विश्वविक्रम आहे.
स्टेनने कसोटीमध्ये सर्वाधिक विकेट ऑस्ट्रेलियाविरुद्ध घेतल्या होत्या. ज्यामध्ये त्याने ७० विकेट्स आपल्या नावे केले. त्यानंतर न्यूझीलंड विरुद्ध त्याने ६८ विकेट घेतल्या, तर भारताविरुद्ध त्याने ६५ विकेट घेतल्या होत्या. तसेच डेल स्टेन दक्षिण आफ्रिका संघाकडून कसोटीमध्ये सर्वात जास्त विकेट्स घेणारा दुसरा गोलंदाज आहे.
स्टेनचे बालपण होते खूप हलाखीचे
स्टेनने त्याच्या आयुष्यात कधीही क्रिकेटर होण्याचा विचारही केला नव्हता. त्याचे कुटुंब झिंबाब्वेमधून दक्षिण आफ्रिकेला स्थायिक झाले होते. परंतु, स्टेनचा जन्म दक्षिण आफ्रिकेतील फालाबोरवामध्ये झाला होता. स्टेनचे वडील एका तांब्याच्या खाणीत काम करत होते. त्याचे कुटुंब अत्यंत गरीब होते. स्टेनला त्याच्या वडिलांसारखे तांब्याच्या खाणीत काम करायचे नव्हते. त्यामुळे त्याने त्याचे गाव सोडण्याचा निर्णय घेतला होता.
एका मुलाखतीत बोलताना स्टेनने सांगितले होते की, तो गावात राहिला असता तर काहीही करू शकला नसता. त्यामुळे तो काहीही करून आपल्या गावापासून ३५० मैल दूर असणाऱ्या जोहान्सबर्ग या शहरात गेला. तिथे तो एका होस्टेलमध्ये राहत होता. ज्यानंतर शाळेमध्ये असताना स्टेन क्रिकेट देखील खेळू लागला. त्यावेळी तो त्याच्या सहकाऱ्यांपेक्षाही जास्त वेगाने गोलंदाजी करायचा.
स्टेनने शालेय शिक्षण पूर्ण केल्यानंतर, एका अकॅडमी सोबत तो जोडला गेला. ज्याचे नाव लेसोथो असे होते. तिथे त्याला प्रिटोरियाच्या एका मोठ्या क्रिकेट ॲकॅडमीमध्ये जाण्याचा सल्ला देखील मिळाला होता. त्यानंतर प्रिटोरिया क्रिकेट अकॅडमीमध्ये त्याच्या गोलंदाजीत खूप चांगला सुधार झाला.
दक्षिण आफ्रिकेचा माजी फलंदाज डॅरेन कलिननने स्टेनला गोलंदाजी करताना पाहिले, आणि तो त्याच्या गोलंदाजीवर अत्यंत प्रभावित झाला. त्यानंतर कलिननने त्याला फँटम प्रोविन्स संघात जागा मिळवून दिली होती. स्टेनने २००३ साली त्याचा पहिला प्रथम श्रेणी सामना खेळला होता. यानंतर त्याला केवळ ७ सामन्यांनंतरच २००४ मध्ये कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण करण्याची संधी मिळाली होती.
पोर्ट एलिझाबेथ कसोटी खेळण्यासाठी स्टेनने बसने १००० कि.मी प्रवास केला होता. स्टेनने एका मुलाखतीत सांगितले होते की, जेव्हा त्याला कसोटी सामन्यासाठी संघात निवडले गेले होते. तेव्हा तो यासाठी तयार नव्हता. तो आतून अजून परिपक्व झाला नव्हता. याला कारण देत स्टेन म्हणाला होता की, तो तेव्हा अजूनही गावातील एक मुलगा जो अनवाणी पायाने कुठेही पळायचा, मासे पकडायचा, आणि जनावरांसोबत खेळायचा असा होता. मानसिक दृष्ट्या तो आंतरराष्ट्रीय क्रिकेटसाठी अजून तयार नव्हता.
स्वतःचे बूट घेण्यासाठी देखील पैसे नव्हते संघ सहकाऱ्यांना मागितली होती मदत
स्टेनने त्याचा पहिला आंतरराष्ट्रीय सामना खेळण्यासाठी दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार शॉन पोलॉककडून बूट मागितले होते. ‘इंडिपेंडेंट’ला दिलेल्या एका मुलाखतीत स्टेनने सांगितले की, पदार्पणाच्या सामन्यात त्याच्याकडे केवळ एक जोडी बूट होते. तो नवीन बूट खरेदी करू शकत नव्हता. यानंतर त्याने शॉन पोलॉककडून त्याचे बूट घेतले होते. आणि पोलॉकने देखील त्याची मदत केली होती.
स्टेनने २००४ साली आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. तेव्हा त्याने २ कसोटी सामन्यात ६ विकेट्स घेतल्या होत्या. ज्यानंतर त्याला २००५ मध्ये केवळ एकाच कसोटी सामन्यात खेळण्याची संधी मिळाली. मात्र २००६ साला पासूनच त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आपली चमक दाखवायला सुरुवात केली. २००६ मध्ये स्टेनने ६ कसोटी सामन्यात २४ विकेट्स घेतल्या होत्या. त्यानंतर २००७ मध्ये ७ कसोटी सामन्यात ४४ विकेट्स, २००८ मध्ये १३ कसोटी सामन्यात ७४ विकेट्स घेत गोलंदाजीचे अप्रतिम प्रदर्शन केले होते. यानंतर तब्बल २३४३ दिवस तो कसोटी क्रिकेटमध्ये अव्वल क्रमांकावर राहिला होता.
महत्त्वाच्या बातम्या –
–Video: श्रीनाथ यांनी टाकलेला तो घातक चेंडू, ज्यामुळे फलंदाज जखमी होऊन पडला होता खाली
–अरे बापरे! शिमरन हेटमायरने चक्क ड्वेन ब्रावोवर उगारली आपली बॅट, पाहा व्हिडिओ
–‘या’ खेळाडूंनी बाकावर बसून घालवला इंग्लंड दौरा, आगामी सामन्यांमध्येही संधी मिळणे कठीण