आयपीएल2019 च्या सुरुवातीला विजय मिळवण्यासाठी संघर्ष करणाऱ्या रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाने मागील तीनही सामने जिंकत स्पर्धेतील आव्हान कायम ठेवले आहे. मात्र असे असतानाच त्यांचा अनुभवी वेगवान गोलंदाज डेल स्टेन आयपीएलच्या उर्वरित मोसमातून दुखापतीमुळे बाहेर पडला आहे.
स्टेन रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघात दुखापतग्रस्त नॅथन कुल्टर नाईलचा बदली खेळाडू म्हणून दाखल झाला होता. परंतू त्यालाही खांद्याची दुखापत झाल्याने आयपीएल 2019 मधून बाहेर पडावे लागले आहे.
स्टेनने बेंगलोरकडून फक्त 2 सामने खेळले आहेत. पण या दोन्ही सामन्यात त्याने चांगली कामगिरी करत बेंगलोरच्या विजयात मोलाचा वाटा उचलला होता. त्याने या दोन्ही सामन्यात प्रत्येकी 2 विकेट्स घेतल्या होत्या.
मात्र त्याला बुधवारी(24 एप्रिल) रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर विरुद्ध किंग्स इलेव्हन पंजाबच्या सामन्याला खांद्याच्या दुखापतीमुळे मुकावे लागले.
त्याच्या दुखापतीबद्दल रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरने प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे की ‘डेल स्टेनच्या खांद्याला सुज आल्याने त्याला पुरेशी विश्रांती घेण्यास सांगण्यात आले आहे. त्याच्या दुखापतीचा विचार करता तो आयपीएलच्या उर्वरित चालू मोसमासाठी उपलब्ध राहू शकत नाही.’
‘त्याच्या उपस्थितीने संघाला खूप मदत झाली आहे. त्याने संघात आणलेल्या प्रेरणेसाठी आम्ही आभारी आहोत. संघाला त्याची उर्जा आणि मैदानावरील वावर याची कमी भासेल. आम्ही तो लवकर बरा व्हावा अशी आशा करतो. तसेच त्याला भविष्यासाठी शुभेच्छा.’
स्टेनन यावर्षी आयपीएलमध्ये 2 वर्षांनी पुनरागमन केले होते. तो या मोसमाआधी शेवटचे 2016 मध्ये गुजरात लायन्स संघाकडून खेळला होता.
महत्त्वाच्या बातम्या –
–संपूर्ण यादी – असे आहेत २०१९ विश्वचषकासाठी सर्व संघांचे खेळाडू
–२०१९ विश्वचषकासाठी विंडीज संघाची घोषणा, आंद्रे रसलचे झाले पुनरागमन
–सीएसकेसाठी विजयी खेळी साकारणाऱ्या शेन वॉटसनने मानले या दोघांचे आभार…