साऊथँम्पटन। जगभरातील प्रत्येक क्रिकेटपटूचे आपल्या देशाच्या राष्ट्रीय संघाकडून कसोटी क्रिकेट खेळण्याचे स्वप्न असते. असेच इंग्लंडचा फलंदाज डॅन लॉरेन्सचे हे स्वप्न लवकरच पूर्ण होणार होते. परंतु अचानक वाईट बातमीने त्याचे पदार्पण टळले. पाकिस्तानविरुद्धच्या मालिकेत राखीव खेळाडूंमध्ये सामील असणारा इंग्लंडचा फलंदाज डॅनच्या कुटुंबातील व्यक्तीचे निधन झाल्यानंतर तो संघाच्या जैव- सुरक्षित वातावरणातून बाहेर पडला आहे. इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्डाने याची माहिती दिली आहे.
ईसीबीने आपल्या निवेदनात म्हटले आहे की, “कसोटी पदार्पणाची वाट पाहणाऱ्या लॉरेन्सला (Dan Lawrence) पाकिस्तानविरुद्धच्या कसोटी मालिकेत राखीव खेळाडू म्हणून सामील केले होते. तो गुरुवारी एजस बाऊलमध्ये सुरु होणाऱ्या दुसऱ्या कसोटीत निवडीसाठी उपलब्ध नसेल.”
“इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्डाचा आग्रह आहे की मीडियाने यावेळी लॉरेन्स आणि त्याच्या कुटुंबाच्या गोपनीयतेचा आदर केला पाहिजे,” असेही ईसीबीने आपल्या निवेदनात पुढे म्हटले आहे.
स्टार अष्टपैलू बेन स्टोक्सही कौटुंबिक कारणास्तव पाकिस्तानविरुद्धच्या तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील उर्वरित दोन सामन्यांतून बाहेर पडला आहे.
ईसीबीने म्हटले की, त्यांनी पर्यायी खेळाडू म्हणून कोणत्याही खेळाडूला सामील केलेले नाही. मागील आठवड्यात वेगवान गोलंदाज ऑली रॉबिनसनला इंग्लंडच्या मोकळ्या स्टेडिअममध्ये होत असलेल्या सराव शिबिरात सामील होण्यास सांगितले होते. तो बॉब विलिस ट्रॉफीसाठी ससेक्स संघाचा भाग होता.
लॉरेन्सने ७० प्रथम श्रेणी सामने खेळले असून त्यात त्याने ३८.४२ च्या सरासरीने ३८०४ धावा केल्या आहेत. सोबतच त्याने गोलंदाजी करताना ९ विकेट्सही घेतल्या आहेत.
इंग्लंडने पाकिस्तानविरुद्धच्या ३ सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिला सामना ३ विकेट्सने जिंकत मालिकेत १-०ने आघाडी घेतली आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
-या दिग्गजाने निवडला किंग्स इलेव्हन पंजाबचा सर्वोत्तम ११ जणांचा संघ, पहा कोणाला केलंय कर्णधार
ट्रेंडिंग लेख-
-४ दिग्गज कर्णधार ज्यांनी भारतीय क्रिकेटचा चेहरामोहरा बदलला
-आयपीएलमध्ये सर्वाधिक सिक्सर मारणाऱ्या ५ फलंदाजांमध्ये पहिल्या दोन स्थानावर आहेत परदेशी क्रिकेटर
-ट्वेंटी२० क्रिकेटमध्ये १२ चेंडूत अर्धशतक झळकावणारे ३ महारथी