---Advertisement---

मोठी बातमी! रे*प केसचा आरोपी धनुष्का गुणतिलकाची श्रीलंका संघातून हकालपट्टी, जामीनही नाही मिळाला

On: सोमवार, नोव्हेंबर 7, 2022 1:41 PM
Danushka Gunathilaka
---Advertisement---

ऑस्ट्रेलियात सुरू असलेल्या टी20 विश्वचषकामध्ये (T20 World Cup) श्रीलंका संघ बाहेर झाला.‌ श्रीलंका संघाने शनिवारी ‌(5 नोव्हेंबर ) इंग्लंडविरुद्ध आपला अखेरचा सामना खेळला. मात्र, त्याचवेळी क्रिकेटजगताला हादरवून सोडणारी एक बातमी समोर आली. श्रीलंका संघाचा अनुभवी फलंदाज धनुष्का गुणतिलका याला पोलिसांनी बलात्काराच्या गुन्ह्यात अटक केली. आता त्याला आंतरराष्ट्रीय क्रिकेटला मुकावे लागणार आहे.

इंग्लंडविरुद्धचा सामना झाल्यावर श्रीलंका संघ मायदेशी परतण्यासाठी सिडनी येथून उड्डाण करणार होता. मात्र, तत्पूर्वी सिडनी पोलिसांनी धनुष्का गुणतिलका (Danushka Gunathilaka) ‌याला अटक केली. एका महिलेने लावलेल्या बलात्काराच्या आरोपानंतर त्याला‌ ही अटक करण्यात आली. तसेच पोलीस या संपूर्ण प्रकरणाचा तपास करत आहेत. 2019 मध्ये देखील अशाच एका प्रकरणात गुणतिलका याचा समावेश असल्याच्या कारणाने श्रीलंका क्रिकेट बोर्डाने त्याच्यावर ‌निलंबनाची कारवाई केली होती. सिडनी प्रकरणानंतरही आता त्याला बोर्डने तिन्ही प्रकारच्या क्रिकेटमधून निलंबित केले आहे. यामुळे भविष्यात तो राष्ट्रीय संघाचे प्रतिनिधित्व करताना दिसणार नाही.

त्याचबरोबर सिडनीच्या स्थानिक न्यायालयानेही या क्रिकेटपटूचा जामीन अर्ज फेटाळला आहे.

बोर्डने अधिकृत अकाउंटवर ट्वीट निवेदन जाहीर केले असून त्यात म्हटले, ‘श्रीलंका क्रिकेट बोर्ड कोणत्याही प्रकारच्या गुन्हेगारी आणि महिलांवरील हिंसाचाराच्या विरोधात आहे. श्रीलंका बोर्ड आणि क्रिकेट परंपरेने नेहमीच महिलांचा सन्मान केला आहे. यामुळेच बोर्डच्या अधिकाऱ्यांनी गुणतिलकाला सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून तात्काळ निलंबित करण्याचा निर्णय घेतला आणि कोणत्याही निवडीसाठी त्याचा विचार करणार नाही.’

‘शिवाय, श्रीलंका क्रिकेट कथित गुन्ह्याची तातडीने चौकशी करण्यासाठी आवश्यक पावले उचलेल आणि ऑस्ट्रेलियातील उपरोक्त न्यायालयीन खटल्याच्या समाप्तीनंतर, खेळाडू दोषी आढळल्यास दंड करण्यासाठी पावले उचलली जातील’, असेही त्या निवेदनात पुढे लिहिले आहे.

गुणतिलका हा या विश्वचषकासाठी मुख्य संघाचा भाग होता. मात्र, पात्रता फेरी दरम्यान दुखापत झाल्यानंतर त्याला स्पर्धेतून बाहेर व्हावे लागले. त्याच्या जागी अशेन बंडारा याचा संघात समावेश करण्यात आला होता. गुणतिलका याने श्रीलंकेचे नेतृत्व देखील काही काळ केले होते. त्याने 2015मध्ये आंतरराष्ट्रीय पदार्पण केल्यापासून ते आतापर्यंत श्रीलंकेसाठी 8 कसोटी, 47 वनडे व 46 टी20 सामने खेळले आहेत.

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
कतारचा फिफा वर्ल्डकप की मृत्यूची खाण! बुंदेसलिगाच्या सामन्यात झळकले “बॉयकॉट कतार 2022” चे बॅनर्स
शाकिब अल हसनचे मोठे विधान, उपांत्य फेरीतून बाहेर पडल्यानंतरही संघावर खुश

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---