भारताविरुद्ध नुकत्याच पार पडलेल्या मर्यादित षटकांच्या मालिकांत दसून शनाकाने श्रीलंकेची सूत्रे सांभाळली. शनाका व संघ टी२० मालिकेतील तिसऱ्या आणि शेवटच्या सामन्यानंतर भारताचा कर्णधार व अनुभवी फलंदाज शिखर धवनशी बोलताना दिसला. या मालिकेत धवन प्रथमच भारतीय संघाचे नेतृत्व करत होता. या दौऱ्यावर धवनच्या नेतृत्वात भारतीय संघाने वनडे मालिका जिंकली. मात्र, टी२० मालिकेमध्ये यजमान श्रीलंकेने २-१ असा विजय मिळविला.
शनाकाने केले धवनचे कौतुक
तिसऱ्या टी२० सामन्यानंतर श्रीलंकेचा कर्णधार दसून शनाका व काही युवा खेळाडू धवनशी बोलताना दिसले. यजमान श्रीलंकेने गुरुवारी (२९ जुलै) भारताविरुद्धच्या टी२० मालिकेतील अंतिम सामना ७ गडी राखून जिंकला आणि मालिका २-१ ने खिशात घातली. सामन्यानंतर शिखर धवन श्रीलंकेच्या खेळाडूंशी संवाद साधताना दिसला. शनाकाने यासाठी धवनचे आभार मानले. धवन हा दीर्घ काळापासून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळत आहे आणि त्याचे क्रिकेटविषयीचे ज्ञान यामुळे आमच्या खेळाडूंना फायदा होऊ शकतो, असे शनाका म्हणाला.
शनाका म्हणाला, “आम्ही आमच्या वरिष्ठ खेळाडूंकडून ज्या पद्धतीने शिकत असतो तसेच, भारतीय खेळाडूंच्या अनुभवातून शिकले पाहिजे. मला ही संधी दिल्याबद्दल मी शिखर धवनचा खरोखर आभारी आहे. शिखर हा असा खेळाडू आहे ज्याला आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळण्याचा दहा वर्षांपेक्षा जास्त अनुभव आहे.”
तो पुढे म्हणाला, ‘मी धवनला विचारले की तो स्वत:ला कसे तयार करतो आणि त्याच्या खेळाचे नियोजन आणि परिस्थिती हाताळण्यासाठी काय महत्वाचे आहे. त्याने क्रिकेट खेळण्यात प्रभुत्व मिळवले आहे. मला वैयक्तिकरित्या वाटले की, शिखरसारख्या खेळाडूशी बोलून आपण खेळात कशी सुधारणा करायची हे अधिक चांगल्या प्रकारे समजून घेऊ शकू.”
Massive respect @SDhawan25 ❤️#SLvIND @OfficialSLC @BCCI pic.twitter.com/0ANy7Mcni3
— Piyum Samuel (@PiyumSamuel) July 29, 2021
शनाकाने केले उत्कृष्ट नेतृत्व
कुसल परेरा दुखापतीमुळे मालिकेपूर्वी बाहेर पडल्याने शनाकाला प्रथमच वनडे संघाचे नेतृत्व करण्याची संधी मिळाली. श्रीलंका संघाने वनडे मालिका गमावली. मात्र, टी२० मालिकेमध्ये संघाला विजय मिळाला. यापूर्वी त्याच्याच नेतृत्वात श्रीलंकेने आपली अखेरची टी२० मालिका पाकिस्तान विरुद्ध जिंकली होती. आगामी टी२० विश्वचषकात तो संघाची जबाबदारी सांभाळताना दिसेल.
महत्त्वाच्या बातम्या-
बाय बाय डरहॅम! पहिल्या कसोटीसाठी नॉटिंघमला रवाना झाली विराटसेना, ‘या’ मैदानावर करणार सराव
इंग्लंडचा अष्टपैलू स्टोक्सची भारताविरुद्धच्या कसोटी मालिकेतून माघार, ‘हा’ खेळाडू घेणार जागा
व्वा रे पठ्ठ्या! मिचेल स्टार्कच्या भावाने टोकियो ऑलिंपिकमध्ये दाखवला दम, मिळवले फायनलचे तिकीट