भारताविरुद्ध मायदेशात सुरु असलेल्या वनडे मालिकेतील तिसऱ्या सामन्याआधी ऑस्ट्रेलियाला मोठा धक्का बसला आहे. ऑस्ट्रेलियाचा सलामीवीर डेविड वॉर्नर आणि वेगवान गोलंदाज पॅट कमिन्स हे दोन मोठे खेळाडू उर्वरित तिसऱ्या वनडेतून आणि त्यानंतर होणाऱ्या टी20 मालिकेतून बाहेर पडले आहेत.
तसेच डॉर्सी शॉर्ट वॉर्नरचा बदली खेळाडू म्हणून टी20 संघात सामील होईल. तो तिसऱ्या वनडे सामन्याआधीच संघाशी जोडला जाईल. तिसरा वनडे सामना 2 डिसेंबरला होणार आहे. त्यानंतर 4 ते 8 डिसेंबर दरम्यान टी20 मालिका होईल.
वॉर्नरला दुसऱ्या वनडेत झाली दुखापत –
वॉर्नरला रविवारी(29 नोव्हेंबर) दुसऱ्या वनडे सामन्यादरम्यान क्षेत्ररक्षण करताना मांडीची दुखापत झाली. या सामन्यात ऑस्ट्रेलिया क्षेत्ररक्षण करत असताना चौथ्या षटकात शिखर धवनने मारलेला चेंडू अडवण्याच्या प्रयत्नात वॉर्नरच्या मांडीच्या स्नायूंमध्ये ताण आला. त्यामुळे तो आता घरी जाईल. तसेच त्याच्या दुखापतीवर काम करेल.
तो 17 डिसेंबरपासून सुरु होणाऱ्या भारताविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी तंदुरुस्त होईल अशी आशा क्रिकेट ऑस्ट्रेलियाला आहे.
कमिन्सला मिळाली विश्रांती –
कमिन्सला कोणत्याही प्रकारची दुखापत नाही. पण तो ऑगस्टपासून सातत्याने क्रिकेट खेळत असल्याने त्याला विश्रांती देण्यात आली आहे. जेणेकरुन तो कसोटी मालिकेसाठी ताजातवाना असेल.
मार्कस स्टॉयनिस संघात कायम –
ऑस्ट्रेलियाचा अष्टपैलू क्रिकेटपटू मार्कस स्टॉयनिसला पहिल्या वनडे दरम्यान दुखापत झाली होती. पण तरीही तो उर्वरित तिसऱ्या वनडेसाठी आणि टी20 मालिकेसाठी संघात कायम राहिल. तसेच तो त्याच्या दुखापतीमुळे सध्या गोलंदाजी करु शकत नसला तरी ऑस्ट्रेलिया त्याला केवळ फलंदाज म्हणून खेळवू शकतात.
मिशेल मार्श अ संघातून बाहेर –
अष्टपैलू मिशेल मार्शला आयपीएल 2020 दरम्यान घोट्याची दुखापत झाली होती. तो या दुखापतीतून अजून सावरला नसल्याने तो ऑस्ट्रेलिया अ संघाकडून भारताविरुद्ध सराव सामने खेळणार नाही.
वनडे आणि टी20 मालिकेसाठी ऑस्ट्रेलियाचा संघ –
ऍरॉन फिंच (कर्णधार), सीन ऍबॉट, ऍश्टन अगर, ऍलेक्स कॅरी, कॅमेरॉन ग्रीन, जोश हेझलवुड, मोसेस हेन्रीक्स, मार्नस लॅब्यूशेन, ग्लेन मॅक्सवेल, डॅनियल सॅम्स, डॉर्सी शॉर्ट, स्टीव्ह स्मिथ, मिशेल स्टार्क, मार्कस स्टॉयनिस, मॅथ्यू वेड, अँड्र्यू टाय, अॅडम झांपा.
महत्त्वाच्या बातम्या –
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पराभवानंतर राहुलकडून भारतीय गोलंदाजांची पाठराखण, फलंदाजांना दिला सल्ला
इंग्लंडचा दक्षिण आफ्रिकेवर ४ विकेट्सने दणदणीत विजय; मलानच्या खेळीने मालिका खिशात