दिल्ली। बुधवारी (२८ एप्रिल) इंडियन प्रीमीयर लीग २०२१ हंगामातील २३ वा सामना चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद संघात पार पडला. या सामन्यात चेन्नईने ७ विकेट्सने विजय मिळवला. असे असले तरी या सामन्यात हैदराबादचा कर्णधार डेव्हिड वॉर्नरने एक खास विक्रम केला आहे.
वॉर्नरचे अर्धशतक
या सामन्यात हैदराबादने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, हैदराबादने जॉनी बेअरस्टोची विकेट लवकर गमावली. पण त्यानंतर मनिष पांडे(६१) आणि डेव्हिड वॉर्नरने १०६ धावांची धावांची भागीदारी रचली. यादरम्यान, दोघांनी वैयक्तिक अर्धशतकेही पूर्ण केली. वॉर्नरने ५५ चेंडूत ३ चौकार आणि २ षटकारांसह ५७ धावांची खेळी केली. हे वॉर्नरचे आयपीएलमधील ५० वे अर्धशतक ठरले.
वॉर्नरचा विक्रम
या खेळीदरम्यान वॉर्नरने आयपीएलमध्ये २०० षटकारांचा टप्पा देखील पार केला. त्याने लुंगी एन्गिडीला १५ व्या षटकात षटकार मारत २०० षटकार पूर्ण केले. त्यानंतर त्याने १६ व्या षटकात रविंद्र जडेजाविरुद्ध आणखी एक षटकार मारत अर्धशतकाला गवसणी घातली.
त्यामुळे आयपीएलमध्ये २०० षटकार मारणारा एकूण ८ वा खेळाडू ठरला. तर चौथा परदेशी खेळाडू ठरला. त्याच्यापूर्वी ख्रिस गेल, एबी डिविलियर्स आणि कायरन पोलार्ड या परदेशी खेळाडूंनी आयपीएलमध्ये २०० षटकार मारले आहेत. तसेच त्यांच्याशिवाय एमएस धोनी, रोहित शर्मा, विराट कोहली आणि सुरेश रैना या भारतीय खेळाडूंनीही आयपीएलमध्ये २०० पेक्षा अधिक षटकार मारले आहेत.
वॉर्नरने आयपीएलमध्ये आत्तापर्यंत १४८ सामन्यात ५४४७ धावा केल्या आहेत. यात त्याने ५२५ चौकार आणि २०१ षटकार मारले आहेत.
आयपीएलमध्ये सर्वाधिक षटकार मारणारे क्रिकेटपटू –
३५४ – ख्रिस गेल (१३८ सामने)
२४५ – एबी डिविलियर्स (१७५ सामने)
२२२ – रोहित शर्मा (२०५ सामने)
२१७ – एमएस धोनी (२१० सामने)
२०४ – विराट कोहली (१९८ सामने)
२०२ – कायरन पोलार्ड (१६९ सामने)
२०२ – सुरेश रैना (१९९ सामने)
२०१ – डेव्हिड वॉर्नर (१४८ सामने)
चेन्नईचा विजय
या सामन्यात हैदराबादने डेव्हिड वॉर्नर आणि मनिष पांडे यांच्या अर्धशतकाच्या जोरावर आणि अखेरच्या षटकांत केन विलियम्सन (२६*) आणि केदार जाधवने(१२*) केलेल्या आक्रमक खेळीमुळे चेन्नईला १७२ धावांचे आव्हान दिले होते. या आव्हानाचा पाठलाग चेन्नईने फाफ डू प्लेसिस (५६) आणि ऋतुराज गायकवाडच्या(७५) अर्धशतकांच्या जोरावर १८.३ षटकात ३ विकेट्सच्या मोबदल्यात सहज पूर्ण केला.
महत्त्वाच्या बातम्या –
आयपीएल इतिहास ५०० चौकार आणि २०० षटकार मारण्याचा विक्रम आहे ‘या’ ३ क्रिकेटपटूंच्या नावावर
लाजवाब! फाफ डू प्लेसिसने हवेत उडी मारत घेतला नेत्रदीपक झेल, पाहा व्हिडिओ
आयपीएलमध्ये चेन्नईकडून ऋतुराज गायकवाडनंतर फाफ डू प्लेसिसने केला ‘तो’ खास विक्रम