लंडन। कालपासून(12 सप्टेंबर) इंग्लंड विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघात द ओव्हल मैदानावर ऍशेस मालिकेतील पाचवा आणि शेवटचा कसोटी सामना सुरु झाला आहे. या सामन्यात ऑस्ट्रेलियाचा सलामीवीर फलंदाज डेव्हिड वॉर्नरने एक नकोसा विक्रम केला आहे.
वॉर्नर आज(13 सप्टेंबर) ऑस्ट्रेलियाच्या पहिल्या डावात 8 चेंडूत 5 धावा करुन बाद झाला. त्याची या ऍशेस मालिकेतील एकेरी धावसंख्येवर बाद होण्याची ही आठवी वेळ आहे. त्यामुळे तो एका कसोटी मालिकेत सर्वाधिक वेळा एकेरी धावसंख्येवर बाद होणारा सलामीवीर फलंदाज ठरला आहे.
त्याने 2019 च्या ऍशेस मालिकेत अनुक्रमे 2, 8, 3, 5, 61, 0, 0, 0, 5 अशा धावा केल्या आहेत.
वॉर्नरला आज इंग्लंडचा वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चरने बाद केले. वॉर्नरचा झेल यष्टीरक्षक जॉनी बेअरस्टोने घेतला. वॉर्नर बाद झाल्यानंतर काहीवेळात ऑस्ट्रेलियाचा दुसरा सलामीवीर फलंदाज मार्कस हॅरिसही 3 धावांवर बाद झाला. त्यामुळे ऑस्ट्रेलियाची अवस्था 2 बाद 14 धावा अशी होती.
पण त्यानंतर मार्नस लॅब्यूशाने आणि स्टिव्ह स्मिथने ऑस्ट्रेलियाचा डाव सांभाळताना तिसऱ्या विकेटसाठी 69 धावांची भागीदारी केली. मात्र ही भागीदारी तोडण्यात आर्चरला यश आले. त्याने लॅब्यूशानेला 48 धावांवर असताना बाद केले. सध्या स्मिथ आणि मॅथ्यू वेड फलंदाजी करत आहेत.
तत्पूर्वी इंग्लंडने पहिल्या डावात सर्वबाद 294 धावा केल्या. ऑस्ट्रेलियाकडून पहिल्या डावात मिशेल मार्शने सर्वाधिक 5 विकेट्स घेतल्या.
एका कसोटी मालिकेत सर्वाधिकवेळा एकेरी धावसंख्येवर बाद होणारे सलामीवीर फलंदाज –
8 – डेव्हिड वॉर्नर (विरुद्ध इंग्लंड, 2019)
7 – अंशुमन गायकवाड (विरुद्ध विंडीज, 1983-84)
7 – माईक अर्थरटॉन (विरुद्ध ऑस्ट्रेलिया, 1997)
क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.
महत्त्वाच्या बातम्या –
–व्हिडिओ: ऑस्ट्रेलियाचा हा क्रिकेटपटू म्हणतो, ‘अनेक ऑस्ट्रेलियन्स माझा तिरस्कार करतात’
–ज्या मैदानात १८ वर्षांपूर्वी विराटने भावाबरोबर सामना पाहिला त्याच मैदानात झाला त्याचा मोठा सन्मान
–दक्षिण आफ्रिकेविरुद्ध रोहित शर्मा या सामन्यात असणार कर्णधार