ऑस्ट्रेलियात आयोजित टी20 विश्वचषकाचा नुकताच समारोप झाला. इंग्लंडने अंतिम सामन्यात पाकिस्तानला पराभूत करत दुसऱ्यांदा विश्वविजेता होण्याचा मान मिळवला. यजमान ऑस्ट्रेलियाला या स्पर्धेत समाधानकारक कामगिरी करता आली नव्हती. गतविजेता असलेल्या ऑस्ट्रेलियाला साखळी फेरीतूनच आपला गाशा गुंडाळावा लागला होता. या सर्व घडामोडीनंतर संघाचा अनुभवी सलामीवीर डेव्हिड वॉर्नर हा एक मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत असल्याची बातमी समोर येत आहे.
मागील विश्वचषकात स्पर्धेचा मानकरी ठरलेल्या वॉर्नर याला या स्पर्धेत सपशेल अपयश आले होते. तो चार सामन्यात एकही अर्धशतक ठोकू शकला नव्हता. यादरम्यान त्याची सरासरी केवळ 11 ची राहिलेली. ऑस्ट्रेलियाच्या खराब कामगिरीनंतर पुढील टी20 विश्वचषकासाठी संघात अधिक युवा खेळाडूंची भरती करण्यात यावी, अशी सूचना काही माजी क्रिकेटपटूंनी केली होती.
या दरम्यानच वॉर्नर याने एका मुलाखतीत बोलताना आपल्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील भविष्याबाबत महत्त्वाचे वक्तव्य केले. तो म्हणाला,
“कदाचित मला लवकर कसोटी क्रिकेट खेळणे थांबवावे लागेल. कारण पुढील वर्षी वनडे विश्वचषक व त्यानंतर 2024 मध्ये टी20 विश्वचषक खेळला जाणार आहे. शक्यतो मी माझ्या कारकिर्दीतील अखेरचे एक वर्ष कसोटी क्रिकेट खेळेल. टी20 क्रिकेटवर मी प्रेम करतो आणि माझे लक्ष 2024 टी20 विश्वचषक असेल.”
डेव्हिड वॉर्नर हा मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये तसेच कसोटी क्रिकेटमध्ये ऑस्ट्रेलियाचा पहिल्या पसंतीचा सलामीवीर आहे. तो तुलनेने इतर खेळाडूंपेक्षा अधिक तंदुरुस्त असल्याने आणखी काही काळ आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळू शकतो. ऍरॉन फिंचने वनडे संघाचे नेतृत्व सोडल्यानंतर, पुढील कर्णधार म्हणून त्याच्या नावाची चर्चा सुरू झाली होती. मात्र, अखेरीस कर्णधार पदाची माळ पॅट कमिन्स याच्या गळ्यात पडली.
(David Warner Thinking About Test Retirement )
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
‘मला त्याच्याबद्दल आदर नाही’, क्रिस्तियानो रोनाल्डोने मॅनचेस्टर युनायटेडचा बॉस एरिक टेन हॅगला फटकारले
VIDEO: कॅप्टन असावा तर जोस बटलरसारखा! सेलिब्रेशनपूर्वी रशिद, मोईनला केले सतर्क; कारण वाचून तुम्हीही व्हाल चकित