दिल्ली कॅपिटल्स संघावरील कोविड-१९च्या संकटाने पुन्हा एकदा डोके वर काढले आहे. रविवारी (०८ मे) सकाळी दिल्ली फ्रँचायझीचा एक नेट गोलंदाज कोविड पॉझिटिव्ह आढळला असल्याचे समजत आहे. परिणामी त्याच्या संपर्कातील इतर खेळाडूंना विलगीकरणात ठेवण्यात आले आहे.
महत्त्वाचे म्हणजे, रविवारी संध्याकाळी ७.३० वाजता दिल्ली विरुद्ध चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात हंगामातील ५५वा सामना रंगणार आहे. हा सामना दिल्लीसाठी करा अथवा मरा सामना आहे. तत्पूर्वी असे वृत्त पुढे आल्याने दिल्ली संघाची चिंता शिगेला पोहोचली आहे.
माध्यमांतील वृत्तांनुसार, आयपीएलशी निगडित एका सूत्राने माहिती दिली आहे की, कोरोना चाचणीत दिल्ली संघाचा एक नेट गोलंदाज कोरोना पॉझिटिव्ह आढळला आहे. त्याच्या संपर्कातील इतर खेळाडूंना खोलीतच राहण्याची सूचना दिली गेली आहे. तसेच भारतीय बोर्डाच्या कोविड नियमांनुसार, दिल्ली संघातील सर्व खेळाडूंची अजून एकदा कोविड चाचणी केली जाईल. तोपर्यंत सर्व खेळाडू त्यांच्या खोलीत आयसोलेशनमध्ये राहतील.