इंडियन प्रीमीयर लीग २०२१ हंगामात रविवारी (१८ एप्रिल) पहिले डबल हेडर सामने खेळले गेले. रविवारचा दुसरा सामना दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध पंजाब किंग्स संघात झाला. वानखेडे स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात दिल्लीने ६ विकेट्सने विजय मिळवला आहे. पंजाबने दिल्लीला १९६ धावांचे आव्हान दिले होते. हे आव्हान दिल्लीने १८.२ षटकात ४ विकेट्स गमावत सहज पार केले. दिल्लीच्या विजयात शिखर धवनने मोलाचा वाटा उचलला.
दिल्लीला विजयाच्या समीप पोहचवल्यानंतर शिखर बाद झाला होता. पण तो बाद झाल्यानंतर रिषभ पंत आणि मार्कस स्टॉयनिसने दिल्लीला पुढे नेण्याचा प्रयत्न केला. मात्र, यावेळी पंतचा १८ व्या षटकात दीपक हुडाने सुरेख झेल घेतला. त्यामुळे पंतला १५ धावा करुन माघारी परतावे लागले. अखेर मार्कस स्टॉयनिस आणि ललित यादवने दिल्लीला विजयापर्यंत पोहचवले. स्टॉयनिस २७ धावावंर आणि ललित १२ धावांवर नाबाद राहिला.
पंजाबकडून झाय रिचर्डसनने सर्वाधिक २ विकेट्स घेतल्या. तर रिले मेरिडथ आणि अर्शदीप सिंगने प्रत्येकी १ विकेट घेतली.
शिखरचे शतक थोडक्यात हुकले
स्मिथच्या रुपात दिल्लीने दुसरी विकेट गमावल्यानंतरही शिखर धवनने आपली लय कायम ठेवली होती. त्याने रिषभ पंतला साथीला घेत दिल्लीचा डाव पुढे नेला होता. मात्र, अखेर त्याला बाद करण्यात झाय रिचर्डसनला यश आले. त्याने १५ व्या षटकात शिखरला ९२ धावांवर त्रिफळाचीत केले. शिखरने ४९ चेंडूत केलेल्या या ९२ धावांच्या खेळीत १३ चौकार आणि २ षटकार मारले.
शिखर-शॉची दमदार सुरुवात
या आव्हानाचा पाठलाग करता दिल्लीकडून पृथ्वी शॉ आणि शिखर धवन सलामीला फलंदाजीसाठी उतरले. त्यांनी सुरुवातीपासून आक्रमक फटके मारले. मात्र, ५९ धावांची भागीदारी झाली असताना ६ व्या षटकात शॉ मोठा फटका मारण्याच्या नादात अर्शदीप सिंगच्या गोलंदाजीवर ख्रिस गेलकडे झेल देऊन बाद झाला. शॉने १७ चेंडूत ३ चौकार आणि २ षटकारासंह ३४ धावांची खेळी केली.
तो बाद झाल्यानंतर स्टिव्ह स्मिथ शिखरला साथ देण्यासाठी मैदानात आला होता. दरम्यान, शिखरने ३० चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केले. त्यानंतर सावधगिरीने खेळणारा स्मिथ ११ व्या षटकात रिले मेरिडथविरुद्ध खेळताना झाय रिचर्डसनकडे झेल देऊन ९ धावांवर बाद झाला.
पंजाबने उभारला १९५ धावांचा डोंगर
पंजाबने प्रथम फलंदाजी करताना २० षटकात ४ बाद १९५ धावा केल्या आणि दिल्लीला १९६ धावांचे आव्हान दिले.
पंजाबकडून केएल राहुलने अर्धशतक केल्यानंतर पुढेही गेलच्या साथीने चांगला खेळ सुरु ठेवला होता. मात्र तो १६ व्या षटकात ५१ चेंडूत ६१ धावांवर बाद झाला. त्यापाठोपाठ ख्रिस गेल ११ धावावंर आणि निकोलस पुरन ९ धावांवर बाद झाला. पण अखेर दिपक हुडा आणि शाहरुख खान यांनी पंजाबला १९५ धावांपर्यंत पोहचवले. हुडा २२ धावांवर आणि शाहरुख १५ धावांवर नाबाद राहिले.
दिल्लीकडून ख्रिस वोक्स, आवेश खान आणि कागिसो रबाडाने प्रत्येकी १ विकेट घेतली.
मयंक अगरवाल, केएल राहुलची शतकी भागीदारी
त्यामुळे प्रथम फलंदाजीसाठी अलेल्या पंजाबकडून मयंक अगरवाल आणि केएल राहुलने सलामीला दमदार फलंदाजी. या दोघांनी दिल्लीच्या गोलंदाजांचा समाचार घेत शतकी सलामी दिली. दरम्यान, मयंक अगरवालने २५ चेंडूत अर्धशतकी खेळी केली. त्याला राहुलनेही चांगली साथ दिली. या दोघांची जोडी चांगलीच जमली असताना अखेर १३ व्या षटकात लुकमन मेरीवालाने मयंकला बाद करत ही भागीदारी तोडली. मयंक ३६ चेंडूत ७ चौकार आणि ४ षटकार मारुन ६९ धावांवर बाद झाला. राहुल आणि मयंकमध्ये १२२ धावांची भागीदारी झाली.
तो बाद झाल्यानंतर काही वेळात रविवारी वाढदिवस असणाऱ्या केएल राहुलनेही अर्धशतकी खेळी केली. त्याने ४५ चेंडूत अर्धशतकाला गवसणी घातली. त्यामुळे पंजाबने १४ षटकात १ बाद १२८ धावा केल्या आहेत.
दिल्लीने जिंकली नाणेफेक
दिल्लीने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. या सामन्यासाठी दिल्लीने अंतिम ११ जणांच्या संघात स्टिव्ह स्मिथला आणि मेरिवाला यांना संधी दिली आहे. तसेच पंजाबने मुरुगन अश्विन ऐवजी जलज सक्सेनाला अंतिम ११ जणांच्या संघात संधी दिली आहे.
असे आहेत ११ जणांचे संघ –
पंजाब किंग्ज: केएल राहुल (यष्टीरक्षक/कर्णधार), मयंक अगरवाल, ख्रिस गेल, दीपक हूडा, निकोलस पूरन, शाहरुख खान, झाय रिचर्डसन, जलज सक्सेना, मोहम्मद शमी, रिले मेरिडथ, अर्शदीप सिंग.
दिल्ली कॅपिटल्स: पृथ्वी शॉ, शिखर धवन, स्टीव्हन स्मिथ, रिषभ पंत(यष्टीरक्षक/कर्णधार), मार्कस स्टॉयनिस, ललित यादव, ख्रिस वॉक्स, आर अश्विन, कागिसो रबाडा, आवेश खान, लुकमन मेरीवाला.