---Advertisement---

सचिनने एकेकाळी धुव्वादार फलंदाजी केलेले स्टेडियम झाले क्वारंटाईन सेंटर

On: गुरूवार, मे 21, 2020 4:13 PM
---Advertisement---

संपूर्ण जगभरात हाहाकार माजवणाऱ्या कोरोना व्हायरसविरुद्ध लढण्यासाठी सध्या संपूर्ण देश एकवटला आहे. अशा परिस्थितीत दिल्ली आणि जिल्हा क्रिकेट असोसिएशननेदेखील (डीडीसीए) एक पाऊल पुढे टाकत मदतीचा हात दिला आहे. त्यांनी प्रवास करत असलेले कामगार आणि कोरोना व्हायरसविरुद्ध मदत करण्यासाठी अरूण जेटली स्टेडियमला तात्पुरते कोरोना सेंटर म्हणून वापरण्याची परवानगी दिली आहे.

एका इंग्रजी वृत्तपत्राने दिलेल्या माहितीनुसार, “अरूण जेटली स्टेडियमचा (Arun Jaitley Stadium) वापर मागील ३ दिवसांपासून उत्तर प्रदेश, बिहार आणि मध्य प्रदेशवरून आलेल्या कामगारांच्या राहण्यासाठी केला जात आहे. तिथे या कामगारांच्या खाणे-पिणे, राहणे या सुविधांव्यतिरिक्त त्यांच्या राज्यांपर्यंत बस आणि रेल्वे स्टेशनपर्यंत पोहोचवण्याची व्यवस्था केली जात आहे. इतकेच नव्हे तर सध्या कामगारांना त्यांच्या घरी जाण्यापूर्वी त्यांची चाचणीदेखील केली जात आहे.”

“या स्टेडियमचा वापर कामगारांच्या मदतीसाठी करण्याची ही पहिलीच वेळ आहे. कर्नल विजय भूषण ( Colonel Vijay Bhushan) यांच्यामते, स्टेडियमचा असा वापर फाळणीदरम्यानही करण्यात आला नव्हता,” असेही यामध्ये सांगण्यात आले होते.

विशेष म्हणजे कर्नल भूषणने १९५९ ते १९७३ दरम्यान दिल्लीकडून प्रथम श्रेणी क्रिकेट खेळले होते.

स्टेडियमबद्दल बोलताना ते म्हणाले की, “या मैदानाला दोन ते अडीच हजार कामगारांच्या राहण्यासाठी तयार करण्यात आले होते. मंगळवारी (१९ मे) कामगारांचा जेव्हा शेवटचा गट स्टेडियममध्ये गेला, तेव्हा संपूर्ण मैदान सॅनिटाईज (स्वच्छ) करण्यात आले होते.”

दिल्ली आणि जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे (डीडीसीए) संयुक्त सचिव राजन मनचंदा यांनी म्हटले की, “आम्हाला सांगण्यात आले होते की, येत्या काही दिवसांमध्ये येथे आणखी कामगारांच्या राहण्याची सोय करण्यात येऊ शकते. आम्हाला दिल्ली शासन आणि दिल्ली आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने एक दिवस आधी १५ मिनिटांची नोटीस दिली होती. ते बेड आणि सर्वकाही घेऊन आले होते. त्यांना दिवसातून दोन वेळा येथे आणले जात होते.”

“पहिल्या दिवशी सकाळी येथे १० बस ५०० लोकांना घेऊन आल्या होत्या. त्यानंतर संध्याकाळी आणखी १० बसेस आल्या. पहिल्यांंदा येणाऱ्या बसेस पुन्हा जात होत्या. आम्ही आमच्या संपूर्ण कर्मचाऱ्यांना कामावर लावले होते. जसे की, इलेक्ट्रीशियन, प्लंबर आणि इतर,” असेही ते यावेळी म्हणाले.

डीडीसीएने आधीच अरूण जेटली स्टेडियमला क्वारंटाईन सेंटर बनविण्यासाठी तयार राहण्यास सांगितले होते. तसेच मुख्यमंत्री सहाय्यता निधीमध्ये ५ लाख आणि पंतप्रधान सहाय्यता निधीमध्ये ११ लाख रुपये मदत म्हणून दिले होते.

या स्टेडियमचे जुने नाव फिरोजशाह कोटला स्टेडियम असे होते. दिल्ली क्रिकेट संघटनेचे दिवंगत अध्यक्ष माजी अर्थमंत्री अरुण जेटली यांच्या नावावरुन स्टेडियमला सध्याचे नाव देण्यात आले आहे. भारतीय संघातील बऱ्याच दिग्गज खेळाडूंनी येथे शतकी खेळी केल्या आहेत.

ट्रेंडिंग घडामोडी-

-भारताकडून वनडे क्रिकेटमध्ये वेगवान अर्धशतक करणारे ५ फलंदाज

-क्रिकेटमधील हे १० हटके स्टॅट्स आजचा तुमचा दिवस करतील खास, पहा

-क्रिकेटच्या इतिहासातील ‘हे’ ५ प्रसंग, जिथे खेळाडूंना नडलाय त्यांचा अतिआत्मविश्वास

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---