भारतीय कसोटी संघाचा उपकर्णधार अजिंक्य रहाणे हा सध्या भारतीय संघासोबत इंग्लंडमध्ये आहे. जागतिक कसोटी चॅम्पियनशिपचा अंतिम सामना खेळल्यानंतर भारतीय संघाने ऑगस्ट महिन्यापासून सुरू होणाऱ्या इंग्लंड विरुद्धच्या पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेपूर्वी विश्रांती घेण्याचे ठरविले आहे. रहाणे देखील आपल्या कुटुंबासोबत इंग्लंडमध्ये सुट्ट्या घालवतोय. मात्र, भारतीय संघाचा माजी यष्टीरक्षक व सध्या समालोचक म्हणून काम करणाऱ्या दीप दासगुप्ता याने रहाणेविषयी एक अत्यंत महत्त्वपूर्ण विधान केले आहे.
रहाणेविषयी दीप दासगुप्ताचे मोठे विधान
भारतीय क्रिकेटमध्ये एमएस धोनीचे आगमन होण्यापूर्वी काहीकाळ यष्टीरक्षणाची जबाबदारी सांभाळलेला दीप दासगुप्ता सद्या प्रसिद्ध समालोचक म्हणून क्रिकेट वर्तुळात ओळखला जातो. तसेच तो आपल्या युट्यूब चॅनेलवरून क्रिकेट चाहत्यांशी संवाद देखील साधत असतो. अशाच एका मालिकेत बोलताना त्याने भारतीय कसोटी संघाचा उपकर्णधार अजिंक्य रहाणेविषयी एक महत्त्वपूर्ण वक्तव्य केले.
तो म्हणाला, “मला वाटते अजिंक्य रहाणे आता पूर्वीसारखा खेळाडू राहिला नाही. २०१५-२०१६ मध्ये तो अप्रतिम खेळत होता. तो मुंबईसाठी रणजी ट्रॉफीमध्ये तिसर्या क्रमांकावर फलंदाजी करताना वेगळाच भासत. मुंबईच्या खेळपट्टीवर गोलंदाजांना साथ मिळते. अशा परिस्थितीतही त्याने भारतासाठी खेळण्याआधी चार ते पाच हजार धावा फटकावल्या होत्या.”
दीप दासगुप्ता याने रहाणेच्या फलंदाजी तंत्राविषयी बोलताना म्हटले, “तुम्ही भारतासाठी खेळायला सुरुवात करता तेव्हा खेळामध्ये काही बदल करावे लागतात. कारण तुम्हाला भारतात फिरकी तर, विदेशात स्विंग गोलंदाजी खेळायची असते. तुम्ही त्याचा त्या वेळेचा आणि आत्ताचा फुटवर्क पाहू शकता. ज्यावेळी तो मोठी खेळी करतो त्यावेळी त्याचा आत्मविश्वास दुणावलेला असतो.”
रहाणे जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यात भारताकडून सर्वाधिक धावा करणारा फलंदाज होता. त्याने पहिल्या डावात ४९ तर, दुसऱ्या डावात १५ धावा बनवल्या. तसेच, या संपूर्ण स्पर्धेत तो भारतासाठी सर्वाधिक धावा बनवणारा फलंदाज ठरला आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
श्रीलंका-भारत मालिकेसाठी समालोचकांच्या पॅनेलची घोषणा, आयपीएल गाजवणाऱ्या ‘या’ शिलेदाराचाही समावेश
‘पृथ्वी शॉला इंग्लंडला बोलावणे म्हणजे इतर खेळाडूंचा अपमान,’ विश्वविजेता कर्णधार संतापला
‘रनमशीन’ विराटची पत्नी अनुष्काही बनणार क्रिकेटपटू, पण रुपेरी पडद्यावर; ‘या’ खेळाडूची साकारणार भूमिका






