आयपीएल फ्रेंचायझी (IPL 2022) चेन्नई सुपर किंग्जचा वेगवान गोलंदाज दीपक चाहर दुखापतीतून सावरण्यासाठी सध्या खूप मेहनत घेत आहे. फ्रेंचायझीने त्यांचा महत्वाचा वेगवान गोलंदाज असलेल्या चाहराला आगामी हंगामासाठी रिटेन केले नव्हते, पण मेगा लिलावात तब्बल १४ कोटी खर्च करून चेन्नईने त्याला पुन्हा संघात घेतले. पण हा हंगाम सुरू होण्यापूर्वीच संघाला मोठा धक्का बसला. कारण आयपीएमधील काही सामन्यांमधून चाहर बाहेर पडण्याची शक्यताही वर्तवली जात आहे. तो सध्या राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत दुखापतीतून सावरण्यासाठी प्रयत्न करत आहे.
वेस्ट इंडीजविरुद्ध मायदेशात खेळल्या गेलेल्या टी-२० मालिकेदरम्यान, चाहर (Deepak Chahar) दुखापतग्रस्त झाला होता. मालिकेतील शेवटच्या सामन्यात गोलंदाजी करताना चाहरला दुखापत झाली होती आणि त्यानंतर श्रीलंकेविरुद्धच्या टी-२० मालिकेतूनही तो बाहेर पडला. त्याची दुखापत गंभीर असल्यामुळे त्यातून सावरण्यासाठी वेळ लागणार आहे. अशात आयपीएलच्या सुरुवातीच्या सामन्यांमध्ये तो उपस्थित राहीलच याची शक्यता फार कमी आहे. यादरम्यानचा त्याने सराव करतानाचा एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्याची खूप चर्चा होत आहे.
व्हिडिओत चाहर त्याच्या दुखापतीवर मात करण्यासाठी सराव करत आहे. चाहरने स्वतःच्या अधिकृत इंस्टाग्राम खात्यावरून हा व्हिडिओ शेअर केला आहे. व्हिडिओसोबत कॅप्शनमध्ये त्याने लिहिले की, “दिल ये जिद्दी है.” त्याच्या या इंस्टाग्राम पोस्टवर त्याची होणारी पत्नी जया आणि बहीण मालती या दोघींच्या खास कमेंट्सही आल्या आहेत. हा व्हिडिओ राष्ट्रीय क्रिकेट अकादमीच्या जीममधील असल्याचे दिसत आहे, ज्याला चाहत्यांकडून मोठ्या प्रमाणात प्रेम मिळत आहे.
https://www.instagram.com/reel/CawxXRKp06s
दरम्यान, बीसीसीआने आयपीएल २०२२ चे वेळापत्रक नुकतेच जाहीर केले आहे. त्यानुसार स्पर्धेचा पहिला सामना गत हंगामातील अंतिम सामना खेळलेल्या संघांमध्ये होईल. म्हणजेच चेन्नई सुपर किंग्ज आणि कोलकाता नाइट रायडर्स हंगामातील पहिल्या सामन्यात आमने-सामने असतील. दीपक चाहर जर हंगामातील काही सामने खेळू शकला, तर चेन्नईकडून मिळणाऱ्या १४ कोटी रुपयांसाठी तो पात्र ठरू शकतो. अन्यथा त्याला हे पैसे मिळण्याची कसलीही शक्यता नाही.