प्रो कबड्डीच्या पाचव्या पर्वात पुणेरी पलटणचा कर्णधार म्हणून जबदस्त कामगिरी करण्याचा विश्वास दीपक हुडाने आज पुणे येथे पत्रकार परिषदेत व्यक्त केला. तो पुणेरी पलटणच्या जर्सी अनावरण प्रसंगी बोलत होता.
“माझ्या संघातील निवडीबद्दल आणि संघ व्यवस्थापनाने दिलेल्या कर्णधारपदाच्या नवीन जबाबदारीबद्दल मी पुणेरी पलटणचा ऋणी आहे.माझ्यावर दाखवलेला विश्वास सार्थ ठरविण्याचा माझा पूर्ण प्रयत्न राहील!” असे मत पुणेरी पलटणचा कर्णधार दिपक निवास हुडा याने व्यक्त केले आहे .
संघाच्या तयारीबद्दल प्रतिक्रिया देताना दिपक म्हणाला,”आम्ही आमच्या संघाच्या तयारीसाठी खूप कष्ट करत आहोत आणि संघ बांधणीचे काम करत आहोत. आमचे मुख्य प्रशिक्षक आम्हाला प्रत्येक पावलांवर अतिशय बारकाईने मार्गदर्शन करतात.ह्या मोसमात नवा संघ आणि आमच्या मुख्य प्रशिक्षक आणि मेंटॉर दोघांच्याही सततच्या मार्गदर्शनामुळे आम्ही सर्वोत्तम कामगिरी करू याचा मला विश्वास आहे.”
उल्लेखनीय बाब म्हणचे दिपक हा केवळ २३ वर्षीय आहे. या मोसमातील तो आतापर्यंतच्या जाहीर झालेल्या कर्णधारांमध्ये सर्वात तरुण कर्णधार आहे!
तसेच तो अष्टपैलू खेळाडू आहे. ‘रेडिंग मशीन’ म्हणून तो ओळखला जातो. आपल्या जलद पदलालित्याने त्याने अनेकांची मने जिंकली आहेत!
यंदा मात्र त्याच्यावर त्याच्या संघाचीही जबाबदारी असेल. स्वभावाने अतिशय शांत असलेला दिपक कर्णधारपदाचे दडपण किती शांततेत हाताळतो याकडे कबड्डीप्रेमी लक्ष्य ठेवून असतील!
– शारंग ढोमसे( टीम महा स्पोर्ट्स )