---Advertisement---

हैदराबाद एफसीची गाडी रूळावर आली, दुसऱ्या स्थानी झेप घेतली; चेन्नईयनचा दारुण पराभव

On: रविवार, डिसेंबर 4, 2022 3:37 PM
Hyderabad FC
---Advertisement---

हिरो इंडियन सुपर लीग २०२२-२३ (आयएसएल)मध्ये चेन्नईयन एफसी आणि हैदराबाद एफसी  यांच्यातल्या लढतीत पाहुण्यांनी वर्चस्व गाजवले. मागील दोन सामन्यांत गतविजेत्यांना हार मानावी लागल्याने त्यांची तिसऱ्या स्थानी घसरण झाली. पण, सलग दोन सामन्यांतील पराभवाची मालिका हैदराबादने आज चेन्नईयनच्या घरच्या मैदानावर संपुष्टात आणली. पहिल्या हाफमध्ये दोन्ही संघांकडून तुल्यबळ खेळ झाला, परंतु मध्यंतरानंतर हालिचरण नर्झरी ( ६५ मि.), चिंग्लेनसाना सिंग ( ७४ मि.) आणि बोर्या हरेरा ( ८५ मि.) यांनी गोल करून हैदराबादला पुन्हा विजयपथावर आणले. चेन्नईयनकडून पीटर स्लिस्कोव्हिच ( ७८ मि.) याने एकमेव गोल केला. अखेरच्या १९ मिनिटांत चेन्नईयनला १० खेळाडूंसह खेळावे लागल्याने हैदराबादने फायदा उचलला. हैदराबादने ३-१ असा विजय मिळवताना तालिकेत दुसऱ्या स्थानी झेप घेतली.

२३व्या मिनिटाला व्हिन्सी बारेट्टो चेंडू डाव्या बाजूने घेऊन हैदराबादच्या पेनल्टी क्षेत्रात शिरला होता आणि त्याने मोक्याच्या क्षणी तो चेंडू पीटर स्लिस्कोव्हिचकडे सोपला. स्लिस्कोव्हिच चेंडू गोलजाळीत पाठवणार तितक्यात आकाश मिश्राने सुरेख बचाव केला. २९व्या मिनिटाला ज्युलियस ड्युकेरने हेडरद्वारे चेंडू गोलजाळीच्या दिशेने अचूक टोलावला होता, परंतु हैदराबादचा गोलरक्षक गुरमीत सिंगने तो रोखला. हा गोल झाला जरी असता तरी तो ग्राह्य धरला गेला नसता, कारण ड्युकेर ऑफ साईड होता. ३०व्या मिनिटाला हालिचरण नर्झरीच्या पासवर हैदराबादला गोलसंधी निर्माण करून दिली. जाओ व्हिक्टरने व्हॉली द्वारे चेंडू गोलजाळीच्या दिशेने टोलावला, परंतु चेन्नईयनचा बचाव तितकाच सुरेख झाला. ३२व्या मिनिटाला बारेट्टोने वन ऑन वन स्थिती असूनही गोल करण्याची संधी गमावली. चेंडू गोलपोस्टच्या वरून गेल्याने चेन्नईयनचे खेळाडू थोडे नाराज झाले.

दोन्ही संघांनी पहिल्या हाफमध्ये तुल्यबळ खेळ केला आणि दोघांचा बचाव यावर भर दिसला. ४२व्या मिनिटाला चेन्नईयनच्या खेळाडूंनी सुरेख पासिंग खेळ करताना आणखी एक ऑन टार्गेट प्रयत्न केला. बारेट्टोचा हा प्रयत्न देखील हैदराबादच्या गोलीने रोखला. पुढच्याच मिनिटाला हैदराबादकडून पलटवार झाला आणि चेन्नईयनचा गोलरक्षक देबजित मजुमदार १८ यार्ड बॉक्सबाहेर आला आणि त्याने व्हिक्टरला रोखले. तेवढ्यात चेन्नईयनचे बचावपटूही पोहोचले आणि हैदराबादचा गोल होऊ दिला नाही. ४५+१ मिनिटाला चेन्नईयनला क्रॉसबारने वाचवले. मोहम्मद यासीरचा तेजतर्रार प्रयत्न पोस्टला लागून अयशस्वी ठरला. हैदराबादचा हा खेळ पाहून चेन्नईयनचे प्रशिक्षक नाराज दिसले. हैदराबादने यजमानांच्या बचावफळीतल्या त्रुटी अखेर शोधल्या आणि आता दुसऱ्या हाफमध्ये  काय होतंय, याची उत्सुकता लागलेली.

अपेक्षेप्रमाणे हैदराबादने मध्यंतरानंतर आक्रमकता तीव्र केली आणि ५३व्या मिनिटाला आकाश मिश्राच्या पासवर जोएल चायनेजेला गोल करण्याची सुरेख संधी मिळाली. परंतु ६ यार्ड बॉक्समध्ये चेन्नईयनच्या दोन बचावपटूंनी त्याला रोखले. ६५व्या मिनिटाला नर्झरीने बॉक्सबाहेरून थेट प्रयत्न केला आणि यावेळेस मजुमदारला तो रोखता आला नाही. हैदराबादने १-० अशी आघाडी घेतली आणि नर्झरी यंदाच्या पर्वात हैदराबादकडून सर्वाधिक ३ गोल करणारा खेळाडू बनला. या गोलने हैदराबादच्या खेळात एक वेगळीच ऊर्जा फुंकली आणि त्यांच्याकडून सातत्याने चेन्नईयनच्या बचावपटूंवर दडपण निर्माण होत राहिले. त्यात ७१व्या मिनिटाला अजित कुमारला सामन्यातील दुसरे पिवळे कार्ड मिळाल्याने त्याला मैदानाबाहेर जावे लागले. आता चेन्नईयनला उर्वरित १९ मिनिटांच्या खेळात १० खेळाडूंसहच खेळावे लागणार होते.

चेन्नईयनसमोरील अडचणी आणखी वाढताना दिसल्या. ७४व्या मिनिटाला चिंग्लेनसाना सिंगने अप्रतिम व्हॉली मारताना गोल करून हैदराबादची आघाडी २-० अशी वाढवली. सहा सामन्यानंतर हैदराबादने सामन्यात एकापेक्षा अधिक गोल केले. ७८व्या मिनिटाला अल खयातीच्या क्रॉसवर स्लिस्कोव्हिचने हेडरद्वारे चेन्नईयनसाठी पहिला गोल केला आणि पिछाडी १-२ अशी कमी केली. पण, ८ मिनिटांत हैदराबादने आणखी एक अप्रतिम गोल केला. बोर्या हरेराने बॉक्स बाहेरून डाव्या पायाने चेंडू गोलजाळीत पाठवला. मजुमदारला याहीवेळेस चेंडू अडवण्याची संधीच मिळाली नाही. इथून चेन्नईयनचे पुनरागमन अशक्य होते आणि हैदराबादने ३-१ असा विजय मिळवून १९ गुणांसह तालिकेत दुसरे स्थान पटकावले.

निकाल : हैदराबाद एफसी ३ ( हालिचरण नर्झरी ६५ मि., चिंग्लेनसाना सिंग ७४ मि., बोर्या हरेरा ८५ मि.) विजयी वि. चेन्नईयन एफसी १ ( पीटर स्लिस्कोव्हिच ७८ मि.).

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
लिटन दासचा झेल पाहून तुमच्याही भुवया उंचावतील, विराट कोहलीने अशा पद्धतीने गमावली विकेट
हैदराबाद एफसी विजयी मार्गावर परतण्यासाठी चेन्नईयन एफसीला भिडणार

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---