नवी दिल्ली | आयपीएलच्या 13 व्या हंगामातील 38 वा सामना दिल्ली कॅपिटल्स आणि किंग्स इलेव्हन पंजाब यांच्यात खेळला गेला. या सामन्यात दिल्लीचा सलामीवीर शिखर धवनने शतकी खेळी केली. त्याच्या या खेळीनंतरही दिल्लीचा पराभव झाला. या लेखात आपण दिल्लीच्या पराभवाची कारणे पाहाणार आहोत.
१. गेल आणि पुरनने केली आक्रमक फलंदाजी
या सामन्यात पंजाबचा धडाकेबाज फलंदाज निकोलस पूरनने 28 चेंडूत 6 चौकार व तीन षटकारांच्या मदतीने 53 धावा केल्या. याशिवाय अनुभवी फलंदाज ख्रिस गेलने दिल्लीचा युवा वेगवान गोलंदाज तुषार देशपांडेच्या षटकात दोन षटकार आणि तीन चौकारांच्या मदतीने 26 धावा केल्या. पूरन आणि गेलच्या या आक्रमक खेळीने पंजाबच्या विजयात मोलाचे योगदान दिले. सलामीवीर केएल राहुल (15) आणि मयंक अगरवाल (10) लवकर बाद झाले. पण गेलने पॉवरप्लेमध्ये स्फोटक फलंदाजी केली, त्याने पंजाबची धावगती कमी होऊ दिली नाही. राहुल, मयंक आणि गेल बाद झाल्यानंतर निकोलस पूरन याने जबाबदारी स्वीकारली आणि ती उत्तम प्रकारे पार पाडली.
२. ग्लेन मॅक्सवेलने केली उत्कृष्ट कामगिरी
आयपीएल 2020 मध्ये आतापर्यंत खराब कामगिरी करणारा अष्टपैलू ग्लेन मॅक्सवेलने या सामन्यात उत्तम फलंदाजी केली. त्याने 24 चेंडूत 32 धावा केल्या. त्याने पंजाबच्या विजयात मोलाचे योगदान दिले. पुरनने मॅक्सवेलबरोबर 69 धावांची भागीदारी केली. मॅक्सवेलने गोलंदाजीतही चांगली कामगिरी केली. त्याने या सामन्यात एक बळी घेतला. त्याने दिल्लीचा स्फोटक फलंदाज रिषभ पंतला बाद केले.
३. दिल्लीने केले खराब क्षेत्ररक्षण
या सामन्यात दिल्लीची गोलंदाजी प्रभावी ठरली नाही. या संघाचे क्षेत्ररक्षणही खराब होते. याचा फायदा पंजाबला झाला. सामन्यानंतर दिल्लीचा कर्णधार श्रेयस अय्यर म्हणाला की, “आमचे क्षेत्ररक्षण खराब होते. आम्ही यातून शिकू आणि पुढील सामन्यात पुनरागमन करू.”
दिल्लीचा वेगवान गोलंदाज कागिसो रबाडाने दोन गडी बाद केले. दिल्लीकडून तो सर्वात यशस्वी गोलंदाज ठरला. रबाडाशिवाय इतर कोणताही गोलंदाज प्रभावित करू शकला नाही. दिल्लीच्या क्षेत्ररक्षकांनीही काही झेल सोडले. तसेच पंतनेही पूरनला धावबाद करण्याची संधी सोडली.
४. धवन व्यतिरिक्त कोणत्याही फलंदाजाला आले नाही यश
अनुभवी फलंदाज शिखर धवनशिवाय दिल्लीचा कोणताही फलंदाज 20 धावांची धावसंख्याही गाठू शकला नाही. खेळपट्टी फलंदाजीसाठी अनुकूल होती. धवन एका टोकाला लढा देत राहिला. धवनने 12 चौकार आणि तीन षटकारांच्या मदतीने 61 चेंडूत नाबाद 106 धावा फटकावल्या. मात्र दिल्लीचे अन्य फलंदाज 20 धावाही करु शकल नाहीत. पृथ्वी शॉ (7), श्रेयस अय्यर (14), रिषभ पंत (14), मार्कस स्टॉयोनिस (9) आणि शिमरॉन हेटमायर (10) हे सर्व फलंदाज लवकर तंबूत परतले.
५. डॅनियल सॅम्सला मिळाले नाही यश
दिल्लीचा वेगवान गोलंदाज एन्रीच नॉर्किए याच्या जागी ऑस्ट्रेलियाच्या डावखुरा गोलंदाज डॅनियल सॅम याचा प्लेइंग इलेव्हनमध्ये समावेश होता. ऑस्ट्रेलियाची टी20 स्पर्धा बिग बॅशच्या मागील तीन हंगामात या गोलंदाजाने दमदार कामगिरी केली होती. पण आयपीएलमधील पदार्पण सामन्यात तो छाप सोडू शकला नाही. त्याने 4 षटकांत 30 धावा दिल्या असून एकही बळी घेतला नाही.
महत्त्वाच्या बातम्या –
चेन्नईची साडेसाती संपेना! ‘हा’ खेळाडू आयपीएल २०२० हंगामातून झाला बाहेर
निकोलस पुरनच्या धडाकेबाज फलंदाजीमुळे मास्टर ब्लास्टरला आठवला ‘हा’ दिग्गज खेळाडू
ट्रेंडिंग लेख –
क्रिकेटमधील खरेखुरे ‘जंटलमॅन’, ‘त्या’ एका कृतीने ‘कपिल देव’ जगभरातील चाहत्यांच्या मनात पोहोचले
विशेष लेख: सेनापती जिंकतोय पण सैन्य हरतंय
गोष्ट एका क्रिकेटरची भाग ३: त्रिशतकाची भविष्यवाणी पदार्पणाआधीच करणारा विरेंद्र सेहवाग!