धरमशाला। आज भारत ब विरुद्ध कर्नाटक संघात देवधर ट्रॉफी २०१८ चा अंतिम सामना रंगणार आहे. या दोन्ही संघातील खेळाडूंची कामगिरी या स्पर्धेत उत्तम झाली आहे.
कर्नाटक संघ या स्पर्धेत दोन्ही साखळी सामन्यात विजय मिळवून अपराजित राहिला आहे, तर भारत ‘ब’ संघाने दोन सामन्यांपैकी एक सामना जिंकून अंतिम सामन्यात प्रवेश केला आहे.
भारत ‘ब’ आणि कर्नाटक हे दोन संघ साखळी सामन्यात समोरासमोर आले आहेत. यांच्यात झालेल्या अटीतटीच्या साखळी सामन्यात कर्नाटकने ६ धावांनी विजय मिळवला होता.
कर्नाटक संघ मागील काही महिन्यांपासून जबरदस्त फॉर्म मध्ये आहे. नुकतेच त्यांनी तिसऱ्यांदा विजय हजारे ट्रॉफीवर आपले नाव कोरले आहे. कर्नाटकडून रवीकुमार समर्थ चांगल्या फॉर्ममध्ये खेळत आहे. त्याने भारत ‘ब’ संघाविरुद्ध शतकी खेळी केली होती तर भारत ‘अ’ संघाविरुद्ध अर्धशतकी खेळी केली होती. त्यामुळे त्याने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.
त्याच बरोबर मागील काही महिन्यांपासून देशांतर्गत क्रिकेटमध्ये अफलातून कामगिरी करणाऱ्या मयंक अग्रवालकडेही सर्वांचे लक्ष असेल. तो यावर्षीच्या मोसमात रणजी ट्रॉफी आणि विजय हजारे ट्रॉफीमध्ये सर्वाधिक धावा करणारा फलंदाज बनला होता. तसेच त्याने या स्पर्धेतही चांगली कामगिरी केली आहे.
याबरोबरच सीएम गौतम, करुण नायर, पवन देशपांडे हे फलंदाज देखील प्रतिस्पर्ध्यांना धोकादायक ठरू शकतात. तसेच अष्टपैलू खेळाडूंमध्ये स्टुअर्ट बिन्नी, कृष्णप्पा गॉथम आणि श्रेयश गोपाळ यांची कामगिरी महत्वाची ठरेल तसेच गोलंदाजीची मदार एम प्रसिद्ध कृष्णा आणि प्रदीप टी यांच्यावर असेल.
भारत ‘ब’ संघाकडून हनुमा विहारी, मनोज तिवारी आणि सिद्धेश लाड यांनी चांगली कामगिरी केली आहे. तिवारीने कर्नाटक विरुद्ध शतक केले होते तर लाडने अर्धशतक केले होते. त्याचबरोबर भारत ‘अ’ संघाविरुद्ध विहिरीने दमदार अर्धशतक करून भारत ‘ब’ संघाला विजय मिळवून दिला होता.
याबरोबरच वेगवान गोलंदाज उमेश यादव, धर्मेंद्र जडेजा, सिद्धार्थ कौल, हर्षल पटेल आणि जयंत यादववर गोलंदाजीची जबाबदारी असणार आहे. जडेजाने भारत ‘अ’ संघाविरुद्ध ४ विकेट्स घेत महत्वाची कामगिरी बजावली होती. तो फलंदाजीही करत असल्याने भारत ब संघात अष्टपैलू खेळाडूची महत्वपूर्ण कामगिरी तो बजावू शकतो.
केव्हा होणार हा सामना?
आज भारत ‘ब’ विरुद्ध कर्नाटक यांच्यात देवधर ट्रॉफी २०१८ चा अंतिम सामना होणार आहे.
कुठे होईल हा सामना?
भारत ‘ब’ विरुद्ध कर्नाटक संघात होणारा देवधर ट्रॉफीचा अंतिम सामना धरमशाला येथील हिमाचल प्रदेश क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर होणार आहे. या स्पर्धेतील सर्व सामने याच मैदानावर झाले आहेत.
किती वाजता सामना सुरु होणार?
दुपारी १.३० वाजता भारत ‘ब’ विरुद्ध कर्नाटक यांच्यातील अंतिम सामन्याला सुरुवात होईल. त्याआधी १.०० वाजता नाणेफेक होईल.
हा सामना कोठे पाहता येणार?
भारत ‘ब’ विरुद्ध कर्नाटक दरम्यान होणारा हा अंतिम सामना हॉटस्टार या वेबसाइटवर ऑनलाईन पाहता येईल.
यातून निवडला जाईल ११ जणांचा संघ :
कर्नाटक : करुण नायर (कर्णधार), मयंक अगरवाल, रविकुमार समर्थ, सीएम गौतम, श्रेयस गोपाळ, कृष्णप्पा गॉथम, प्रदीप टी, पवन देशपांडे, प्रसिध कृष्णा, जगदीश सुचित, स्टुअर्ट बिन्नी, रोनीत मोरे, शरथ बीआर, अभिमन्यू मिथुन, अभिषेक रेड्डी.
भारत ‘ब’: अक्षयदीप नाथ, श्रेयस अय्यर (कर्णधार), ऋतुराज गायकवाड, अभिमन्यु इसावराण, मनोज तिवारी, सिद्धेश लाड, श्रीकर भारत, जयंत यादव, धर्मेंद्रसिंग जाडेजा, हनुमा विहारी, सिद्धार्थ कौल, के. खलील अहमद, हर्षल पटेल, उमेश यादव, रजत पाटीदार.