---Advertisement---

जय शाहंचा उत्तराधिकारी! या व्यक्तीला मिळाली बीसीसीआयच्या सचिवपदाची जबाबदारी

On: सोमवार, डिसेंबर 9, 2024 5:36 PM
Jay Shah
---Advertisement---

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (बीसीसीआय) अध्यक्ष रॉजर बिन्नी यांनी संयुक्त सचिव देवजीत सैकिया यांची बीसीसीआयचे अंतरिम सचिव म्हणून नियुक्ती केली आहे. बीसीसीआय अध्यक्षांनी घटनेत दिलेल्या विशेष अधिकारांचा वापर करत सैकिया यांची सचिवपदी नियुक्ती केली. जय शाह हे गेली अनेक वर्षे या पदावर होते. त्यांनी डिसेंबर 2024 मध्ये आयसीसीचं अध्यक्षपद स्वीकारलं. यामुळे त्यांना बीसीसीआयचं सचिवपद सोडावं लागलं.

बीसीसीआयच्या घटनेच्या अनुच्छेद 7.2 (डी) मध्ये असं म्हटलं आहे की, कार्यालयातील कोणतीही जागा रिक्त असल्यास किंवा पदाधिकारी आजारी असल्यास, रिक्त जागा योग्यरित्या भरल्या जाईपर्यंत किंवा आजारी व्यक्ती बरा होईपर्यंत अध्यक्षानं दुसऱ्या पदाधिकाऱ्याला जबाबदारी सोपविली पाहिजे.

पुढील वर्षी सप्टेंबरमध्ये बीसीसीआयच्या निवडणूका होणार आहेत. ही नेमणूक तोपर्यंत आहे की नाही, याबाबत अद्याप काहीही स्पष्टता नाही. बीसीसीआयच्या नवीन सचिवाची निवड होईपर्यंत सहसचिव सैकिया हेच या पदाचा कार्यभार सांभाळतील. बीसीसीआय सदस्यांचा कार्यकाळ 3 वर्षांचा असतो.

क्रिकबझच्या रिपोर्टनुसार, आश्चर्याची बाब म्हणजे, बीसीसीआय अध्यक्ष रॉजर बिन्नी यांनी देवजीत सैकिया यांना सचिवपदाची जबाबदारी सोपवल्याचा अधिकृत मेल कोणत्याही राज्य संघटनेला पाठवलेला नाही. सैकिया यांना फक्त अंतरिम आधारावर सचिव म्हणून काम करण्यास सांगितलं आहे. त्याच्याकडे केवळ स्वाक्षरी करण्याचा अधिकार आहे.

जय शाह यांनी आयसीसीचे अध्यक्ष म्हणून पदभार स्वीकारल्यामुळे बीसीसीआयमध्ये अंतरिम सचिवाच्या नियुक्तीची गरज निर्माण झाली. आयसीसीचे स्वतंत्र अध्यक्ष म्हणून शाह इतर कोणत्याही सदस्य मंडळाशी संलग्न राहू शकत नाहीत. सैकिया यांनी अलीकडेच आयसीसीमध्ये बीसीसीआयचं प्रतिनिधित्व केलं होतं. शाह यांनी पदभार स्वीकारला तेव्हा ते दुबई येथे झालेल्या आयसीसी बोर्डाच्या बैठकीत उपस्थित होते.

हेही वाचा – 

दक्षिण आफ्रिका WTC फायनलपासून केवळ एक पाऊल दूर, भारताच्या अडचणी वाढल्या
डीएसपी मोहम्मद सिराजला तेलंगणा सरकारकडून किती पगार मिळतो? पदवी नसूनही नियुक्ती कशी झाली?
टीम इंडियासाठी पुढील 24 तास अत्यंत महत्त्वाचे, जाणून घ्या काय आहे संपूर्ण प्रकरण

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---