कोलंबो येथील आर प्रेमदासा स्टेडियमवर श्रीलंका विरुद्ध भारत संघात तीन टी२० सामन्यांच्या मालिकेतील दुसरा सामना बुधवारी (२८ जुलै) खेळला गेला. श्रीलंकेने हा सामना आपल्या नावे करत १-१ अशी मालिकेत बरोबरी केली. भारताकडून या सामन्यात तब्बल चार खेळाडूंनी पदार्पण केले. या सामन्यातून आंतरराष्ट्रीय पदार्पण करणाऱ्या युवा फलंदाज देवदत्त पडिक्कलने एक नवा विक्रम बनवला.
भारताचा ८९ वा टी२० क्रिकेटपटू बनला पडिक्कल
कर्नाटकसाठी देशांतर्गत क्रिकेटमध्ये खोर्याने धावा काढणाऱ्या व इंडियन प्रीमियर लीगमध्ये (आयपीएल) रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरसाठी मागील दोन हंगामात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या युवा सलामीवीर देवदत्त पडिक्कल याला श्रीलंकेविरुद्धच्या दुसऱ्या टी२० सामन्यातून आंतरराष्ट्रीय पदार्पणाची संधी देण्यात आली. तो भारताचा ८९ वा टी२० क्रिकेटपटू बनला. त्याच्यासह ऋतुराज गायकवाड, चेतन सकारिया व नितीश राणा यांनी देखील टी२० पदार्पण केले.
पडिक्कलच्या नावे नवा विक्रम
या सामन्यातून पदार्पण करताना देवदत्त पडिक्कलने एक खास विक्रम आपल्या नावे केला. पडिक्कल २१ व्या शतकात जन्मलेला पहिला भारतीय पुरुष क्रिकेटपटू ठरला. देवदत्तची जन्मतारीख ७ जुलै २००० अशी आहे. भारतासाठी खेळणारी २१ व्या शतकातील पहिली क्रिकेटपटू होण्याचा मान भारतीय महिला संघाची आक्रमक सलामीवीर शेफाली वर्मा हिच्याकडे जातो. तिचा जन्म २००४ सालातील आहे.
पहिल्या सामन्यात मोठी धावसंख्या उभारण्यात अपयशी ठरला पडिक्कल
देशांतर्गत क्रिकेट व आयपीएलमधील चांगल्या कामगिरीचे बक्षीस म्हणून पडिक्कलला श्रीलंका दौऱ्यासाठी भारतीय संघात निवडले गेले होते. वनडे मालिकेत त्याला संधी मिळाली नव्हती. टी२० मालिकेतील दुसऱ्या सामन्यापूर्वी अष्टपैलू कृणाल पंड्या कोरोनाबाधित आढळल्याने व त्याच्या संपर्कात आठ खेळाडूंना क्वारंटाईन करावे लागल्याने पडिक्कलला संधी मिळाली. या सामन्यात तिसऱ्या क्रमांकावर खेळताना तो २३ चेंडूमध्ये २९ धावा काढून माघारी परतला.
महत्त्वाच्या बातम्या –
श्रेयस अय्यरने सुरु केली आयपीएलची तयारी, ‘या’ दिग्गजांकडून घेतोय प्रशिक्षण