आयपीएल ऑक्शन 2026 मध्ये न्यूझीलंडचा अनुभवी फलंदाज डेव्हॉन कॉनवेचं नाव पुकारलं गेलं तेव्हा त्याच्यावर बोली लागेल, अशी अपेक्षा होती. कॉनवेने 2 कोटी रुपयांची बेस प्राईस ठेवली होती. मात्र आश्चर्यकारकरीत्या कोणत्याही फ्रँचायझीने त्याच्यावर बोली लावली नाही आणि तो अनसोल्ड राहिला. ऑक्शनमधील या दुर्लक्षानंतर कॉनवेने आपल्या फलंदाजीने जोरदार उत्तर दिलं आहे.
न्यूझीलंड आणि वेस्ट इंडीज यांच्यात सुरू असलेल्या तिसऱ्या कसोटी सामन्यात डेव्हॉन कॉनवेने पहिल्या डावात शानदार शतक झळकावलं. 18 डिसेंबर रोजी झालेल्या या खेळीत त्याने संयमी आणि शिस्तबद्ध फलंदाजी केली. कॉनवेने 149 चेंडूंमध्ये आपलं शतक पूर्ण केलं. या दरम्यान त्याने 17 चौकार खेचले. अनावश्यक धोके न पत्करता योग्य जागा शोधून धावा काढणं, ही त्याच्या खेळीची खास बाब ठरली.
ही खेळी कॉनवेची कसोटी कारकिर्दीतील सहावी शतकी खेळी आहे. तसेच वेस्ट इंडीजविरुद्धचं हे त्याचं पहिलंच कसोटी शतक ठरलं. डावखुरा फलंदाज असलेल्या कॉनवेने कठीण परिस्थितीत न्यूझीलंडचा डाव सावरत आपली गुणवत्ता सिद्ध केली. संघाच्या दृष्टीने ही खेळी अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे.
आयपीएल ही व्हाईट बॉल क्रिकेटची स्पर्धा असली, तरी कसोटी क्रिकेटमधील अशी भक्कम खेळी खेळणं हे कॉनवेच्या उत्तम फॉर्मचं स्पष्ट उदाहरण आहे. कोणत्याही फॉरमॅटमध्ये स्वतःला जुळवून घेण्याची क्षमता त्याने पुन्हा एकदा दाखवून दिली आहे.





