संयुक्त अरब अमिरातीमध्ये सध्या सुरु असलेल्या एशिया कप स्पर्धेनंतर भारतीय संघ विंडिज विरुद्ध कसोटी मालिका खेळणार आहे. या मालिकेसाठी भारतीय संघनिवडीच्या बाबतीत बीसीसीआयच्या निवड समितीची बुधवारी मुंबईमध्ये बैठक झाली.
पण बीसीसीआयच्या सुत्रांनी सांगितले की या कसोटी संघाची अधिकृत घोषणा ही 28 सप्टेंबरला होणाऱ्या एशिया कपच्या अंतिम सामना पार पडल्यानंतर होईल.
विंडिज विरुद्ध भारतीय संघ दोन कसोटी सामने खेळणार आहे. यातील पहिला सामना 4-8 आॅक्टोबरला राजकोट येथे आणि दुसरा कसोटी सामना 12-16 आॅक्टोबरला हैद्राबादमध्ये होणार आहे.
बुधवारी पार पडलेल्या निवड समीतीच्या बैठकीत शिखर धवन, इशांत शर्मा आणि आर अश्विन यांच्या नावावर चर्चा झाली आहे.
कारण शिखरला मागील काही महिन्यांपासून कसोटीत सातत्याने अपयश आले होते. तर इशांत आणि अश्विन हे वेळेत दुखापतीतून बाहेर येण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र असे असले तरी त्यांची निवड जवळ जवळ पक्की आहे.
भारतीय संघ विंडिज विरुद्धच्या या कसोटी मालिकेकडे आॅस्ट्रेलिया दौऱ्याची तयारी म्हणून पाहत आहे. त्यामुळे निवड समिती सदस्यही आॅस्ट्रेलिया दौऱ्याचा विचार करुन खेळाडूंना संधी देणार आहेत.
सलामीवीर फलंदाजीसाठी मुरली विजय, केएल राहुल आणि धवनचा विचार होऊ शकतो. विजयला जरी काही दिवसांपूर्वी पार पडलेल्या इंग्लंड दौऱ्यातील शेवटच्या दोन कसोटींसाठी वगळण्यात आले होते.
पण त्यानंतर त्याने कौउंटी क्रिकेटमध्ये चांगला खेळ केला आहे. तर राहुलने इंग्लंड विरुद्ध द ओव्हल मैदानावर झालेल्या कसोटी सामन्यात 149 धावा केल्या होत्या. मात्र धवनच्या बाबतीत प्रश्न चिन्ह आहे.
असे असले तरी धवनने एशिया कपमध्ये चांगली कामगिरी केली आहे. तसेच तो आशिया खंडात त्याची फलंदाजी बहरते. मात्र भारतीय उपखंडाच्या बाहेर कसोटीत धवनला अपयश येत आहे.
त्यामुळे आॅस्ट्रेलिया दौऱ्यावर जाण्यापूर्वी धवनला विंडिज विरुद्ध संधी दिल्यास त्याला आॅस्ट्रेलियाच्या मिशेल स्टार्क, पॅट कमिंन्स आणि जॉस हेजलवूड यांना सामोरे जाण्यासाठी सराव मिळेल.
पण त्याचबरोबर पृथ्वी शॉ आणि मयंक अगरवाल हे सुद्धा संधीची वाट पाहत आहेत. त्यामुळे त्यांनाही विंडिज विरुद्ध संधी दिली जाण्याची शक्यता नाकारती येत नाही.
शॉला इंग्लंड विरुद्धच्या शेवटच्या दोन कसोटी सामन्यांसाठी भारतीय संघात स्थान देण्यात आले होते. पण त्याला 11 जणांच्या संघात संधी मिळाली नव्हती.
तसेच एशिया कपसाठी विश्रांती देण्यात आलेला भारताचा नियमित कर्णधार विराट कोहलीही विंडिज विरुद्धच्या कसोटी मालिकेतून पुनरागमन करेल. याबरोबरच अजिंक्य रहाणे, चेतेश्वर पुजारा आणि रिषभ पंत यांनीही विंडिज विरुद्ध संधी दिली जाईल.
त्याचबरोबर मधल्या फळीसाठी हनुमा विहारी आणि करुण नायर यांचा पर्याय उपलब्ध आहे.
तसेच गोलंदाजांमध्ये भारतीय संघात भुवनेश्वर कुमार पुनरागमन करेल. फिरकी गोलंदाजीसाठी कुलदीप यादव आणि रविंद्र जडेजा हे पर्याय असतील तर वेगवान गोलंदाजांमध्ये जसप्रीत बुमराहदेखील असेल.
मात्र अश्विन आणि इशांत यांच्या खेळण्याबाबत संभ्रम आहे. त्यांनी विजय हजारे ट्रॉफीमधूनही माघार घेतली होती.त्यामुळे जर अश्विनला विश्रांती दिली तर त्याच्या ऐवजी विहारी बदली फिरकी गोलंदाज म्हणून गोलंदाजी करु शकतो.
तसेच कृष्णप्पा गॉथम आणि जयंत यादव हे देखील अश्विनला पर्याय म्हणून उपलब्ध आहेत. याबरोबरच जबरदस्त फॉर्ममध्ये असलेला शाहबाझ नदीमचाही पर्याय आहे. पण यासाठी त्याला जडेजा आणि कुलदीपशी संघातील जागेसाठी स्पर्धा करावी लागेल.
महत्त्वाच्या बातम्या-
–बापरे! भारत दौऱ्यावर आलेल्या त्या संघाला सरावाला साधं मैदान मिळालं नाही
–कर्णधार विराट कोहलीही अपवाद नाही, ही गोष्ट करावीच लागणार
–ह्या दोन चाहत्यांनी दाखवून दिले क्रिकेटला कुठल्याही सीमा नाहीत