इंडियन प्रीमियर लीगमध्ये (आयपीएल २०२१) रविवारी (२६ सप्टेंबर) दोन सामने खेळले गेले. अबुधाबी येथे दिवसातील पहिल्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्स (सीएसके) व कोलकाता नाईट रायडर्स (केकेआर) आमने सामने आले. केकेआरचा कर्णधार ओएन मॉर्गनने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. केकेआरच्या सर्व फलंदाजांनी उपयुक्त योगदान देत संघाला १७१ धावांपर्यंत मजल मारून दिली. मात्र, चेन्नईने या धावांचा सहजतेने पाठलाग केला. त्याचवेळी चेन्नईचा कर्णधार एमएस धोनीने एका नव्या आयपीएल विक्रमाला गवसणी घातली.
धोनीचा आयपीएल विक्रम
आयपीएलमधील सर्वात अनुभवी यष्टीरक्षक असलेल्या चेन्नईच्या एमएस धोनीने या सामन्यात नव्या आयपीएल विक्रमाला गवसणी घातली. धोनीने या सामन्यात दोन झेल पकडून आयपीएल इतिहासात सर्वाधिक झेल घेणारा यष्टीरक्षक होण्याचा मान मिळवला. त्याच्या नावावर आता ११६ झेल झाले आहेत. त्याने ११५ झेल पकडणाऱ्या दिनेश कार्तिकला मागे टाकले. विशेष म्हणजे त्याने हा विक्रमी झेल दिनेश कार्तिकचाच पकडला.
चेन्नईचा प्ले ऑफमध्ये प्रवेश
प्रथम फलंदाजी करताना केकेआरच्या सर्व फलंदाजांनी उपयुक्त योगदान दिले. राहुल त्रिपाठीने आपला शानदार फॉर्म कायम राखत ४५ धावांची खेळी केली. नितीश राणा व दिनेश कार्तिक यांनी अनुक्रमे ३७ व २६ धावांचे योगदान दिले. सीएसकेसाठी अष्टपैलू शार्दूल ठाकूर व जोश हेजलवूडने प्रत्येकी दोन बळी मिळवले.
प्रत्युत्तरात चेन्नईला ऋतुराज गायकवाड व फाफ डू प्लेसिस यांनी शानदार ७४ धावांची सलामी दिली. मात्र अचानक एका पाठोपाठ तीन फलंदाज बाद झाल्याने सामन्यात रंगत आली होती. १९ व्या षटकात रवींद्र जडेजाने २० धावा काढून सामना चेन्नईच्या बाजूने झुकवला. उरलेल्या चार धावा काढण्यासाठी केकेआरचा गोलंदाज सुनील नरीनने चेन्नईला झुंजवले. मात्र, अखेरच्या चेंडूवर एक धाव काढत दीपक चहरने संघाला सामना जिंकून दिला. यासह चेन्नईने पुन्हा एकदा गुणतालिकेत अव्वल स्थान गाठत, प्ले ऑफमध्ये स्थान मिळवले.