सोमवारी (१९ एप्रिल) आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने श्रीलंकेचा माजी क्रिकेटपटू दिलहारा लोकुहेतेगेवर बंदी घातली असल्याची धक्कादायक बातमी समोर येत आहे. आयसीसीच्या लाचलुचपत प्रतिबंधक कायद्याचे उल्लंघन केल्याचे आरोप त्याच्यावर लावण्यात आले आहेत. त्यामुळे आता त्याला तब्बल ८ वर्षांच्या बंदीला सामोरे जावे लागणार आहे.
आयसीसीने याआधीच ३ एप्रिल २०१९ रोजी त्याचे निलंबन केले होते. त्यामुळे त्याच्या बंदीचा कालावधी ३ एप्रिल २०१९ पासून सुरु झाला आहे.
आयसीसीने माहिती दिली आहे की संपूर्ण सुनावणीनंतर आणि लेखी व तोंडी युक्तिवादानंतर न्याय समीतीने त्याला काही आरोपांसाठी दोषी ठरवले आहे. ते आरोप असे की कलम २.१.१ नुसार एखाद्या सामन्याचा निकाल किंवा सामन्याचा एखादा भाग फिक्स करणे किंवा तसे करण्याचा प्रयत्न करण्याच्या कराराचा भाग असणे.
त्याच्यावर दुसरा आरोप २.१.४ कमलनुसार असा आहे की प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष एखाद्या सदस्याला २.१ नियमाचा भंग करण्यासाठी प्रोत्साहित करणे किंवा प्रलोभन देणे किंवा विणवनी करणे. त्याचबरोबर कलम २.४.४ नुसार त्याच्यावर तिसरा आरोप लावण्यात आला आहे भ्रष्टाचार संबंधित नियमांचे उल्लंघन केल्याची कोणतीही माहिती पुरवण्यासही त्याने अक्षमता दाखवली आहे.
याबरोबरच दिलहारा लोकुहेतेगेवर आयसीसीने अमिराती क्रिकेट बोर्डाच्या वतीनेही आरोप लावला आहे की टी१० लीगच्या लाचलुचपत प्रतिबंधक संहितेमधील तीन कलमांचे उल्लंघन केले आहे. या आरोपावरील कारवाई अजून सुरु आहे.
आयसीसीने हिथ स्ट्रिकवरही घातली आहे ८ वर्षांची बंदी
आयसीसीच्या लाचलुचपत प्रतिबंधक कायद्याचे उल्लंघन केल्याप्रकरणी बंदी येणारा लोकुहेतेगे पहिला माजी क्रिकेटपटू नाही. काहीदिवसांपूर्वीच आयसीसीने झिम्बाब्वेचा माजी कर्णधार आणि प्रशिक्षक हिथ स्ट्रिकवरही ८ वर्षांची बंदी घातली आहे.
झिम्बाब्वेच्या महान गोलंदाजांपैकी एक असणारा हिथ स्ट्रिक २०१७ ते २०१८ दरम्यान झालेल्या अनेक सामन्यांमध्ये संशयाच्या भोवऱ्यात अडकला होता. या सामन्यांमध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेट, आयपीएल, बांगलादेश प्रीमियर लीग आणि अफगाणिस्तान प्रीमियर लीग सामन्यांचा समावेश आहे. प्रशिक्षक म्हणून त्याच्यावर अनेक भ्रष्टाचार विरोधी नियमांचे उल्लंघन केल्याचा आरोप होते.
महत्त्वाच्या बातम्या –
सहकार्यांना साथ देण्यासाठी वॉर्नर आणि विलियम्सनने पाळले रोजे, राशिद खान व्हिडिओ शेअर करत म्हणाला…