भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली हा सध्याच्या घडीला जगातील सर्वोत्तम खेळाडू आहे. कसोटी, वनडे आणि टी20 क्रिकेटच्या प्रकारात कोहलीने आपला दबदबा निर्माण केला आहे. या तीन प्रकारात 50 च्या सरासरीने खेळणारा जगातला एकमेव फलंदाज. विराट कोहली आपल्या मेहनतीच्या जीवावर यशाच्या शिखरावर पोहोचला असला तरी त्याचे हे टॅलेंट शोधून जगापुढे आणण्यामध्ये माजी कर्णधार दिलीप वेंगसरकर यांचा देखील हात आहे.
निवड समितीचे माजी अध्यक्ष दिलीप वेंगसरकर यांनी विराट कोहलीच्या प्रवासाचा उलगडा करत एका संकेतस्थळाशी बोलताना म्हणाले की, “बीसीसीआयने भारतातील युवा क्रिकेटपटूंचा शोध घेण्यासाठी एक समिती नियुक्त केली होती. त्या समितीचा मी अध्यक्ष होतो. माझ्यासोबत ब्रिजेश पटेल देखील होते. मी देशभर 14, 16 आणि 19 वर्षाखालील सामने पाहण्यासाठी जायचे. विराट कोहलीला मी पहिल्यांदा 16 वर्षांखालील मुंबईविरुद्धच्या सामन्यात खेळताना पाहिलो. विराट कोहली तेव्हा लालू यादव यांचा मुलगा तेजस्वी यांच्या नेतृत्वाखाली खेळत होता. विराट कोहलीने त्या सामन्यात जबरदस्त फलंदाजी केली.”
“त्यानंतर ऑस्ट्रेलिया येथे इमर्जिंग ट्रॉफी होणार होते. यासाठी मी विराट कोहलीची निवड केली. तेथे मी विराट कोहलीला पाहिले. त्यावेळी माझ्यासोबत ग्रेग चॅपल देखील बसले होते. किवी संघाविरुद्धच्या सामन्यात विराट सलामीला खेळताना धावांचा पाठलाग करताना 123 धावांची नाबाद शतकी खेळी केली. शतक पूर्ण झाल्यानंतरही तो बाद झाला नाही. सामना जिंकूनच तो मैदानातून परतला. त्यावेळेस मला वाटले की, हा खेळाडू पुढे भारतीय संघातून खेळताना दिसेल. विराट एक मानसिक दृष्ट्या परिपक्व आहे. आम्ही त्याला पुढे भारतीय संघात खेळण्याची संधी दिली,” असेही ते पुढे म्हणाले.