कानपूर कसोटीत आपल्या गोलंदाजीने आणि फलंदाजीने सगळ्यांना प्रभावित करणाऱ्या रविचंद्रन अश्विनचे सर्वत्र कौतुक होत आहे. या कसोटी सामन्यात फलंदाजी आणि गोलंदाजीमध्ये उपयुक्त योगदान देत अश्विनने मोलाची भूमिका बजावली. यानंतर एका वरिष्ठ भारतीय क्रिकेटपटूने त्याची तुलना चक्क भारताचे सर्वकालीन महान अष्टपैलू कपिलदेव यांच्याशी केली आहे.
कानपूर कसोटीच्या चौथ्या दिवशीचा खेळ संपल्यानंतर भारताचा वरिष्ठ यष्टिरक्षक फलंदाज दिनेश कार्तिकने हे वक्तव्य केले आहे. अश्विनने चौथ्या दिवशी मोक्याच्या क्षणी ३२ धावांची खेळी केली. यानंतर गोलंदाजी करताना न्यूझीलंडचा सलामीवीर विल यंग त्याचा बळी ठरला. यासह त्याने कसोटी क्रिकेटमध्ये भारताकडून सर्वाधिक बळी घेण्याच्या बाबतीत हरभजन सिंगची बरोबरी केली होती. हरभजन सिंगच्या नावे ४१७ कसोटी विकेट आहेत. अश्विनच्या नावे आता ४१९ विकेट्सची नोंद झाली आहे.
एका कार्यक्रमामध्ये कार्तिकने सांगितले की, त्याने कपिल देव यांना जास्त खेळताना पाहिलेले नाही. मात्र, कपिल देव आणि रविचंद्रन अश्विन हे दोघेही देशासाठी सर्वोत्कृष्ट मॅचविनर असल्याची टिप्पणी त्याने केली. तो म्हणाला, ‘या दोघांची मी तुलना करू इच्छित नाही. मात्र, हे मान्य करावेच लागेल की भारतीय क्रिकेटचा विचार केला तर दोघांचे नाव एकाच पातळीवर घेतले पाहिजे. कारण दोघेही मॅचविनर राहिले आहेत.’
अश्विनसोबत खेळणारा आणि त्याला जवळून पाहणारा कार्तिक म्हणाला की, अश्विन हा भारताच्या सर्वोत्तम अष्टपैलू खेळाडूंपैकी एक मानला पाहिजे. यासंदर्भात कोलकाता नाईट रायडर्सचा माजी कर्णधार म्हणाला, ”८० कसोटींमध्ये ४१७ बळी घेणे हा एक अविश्वसनीय विक्रम आहे. त्याने आपल्या फलंदाजीनेही दमदार योगदान दिले आहे. कसोटी क्रिकेटमध्ये त्याने पाच शतके झळकावली आहेत. अश्विनने कसोटी सामन्यांमध्ये खुप काळ खेळलेल्या फलंदाजांपेक्षा चांगली कामगिरी केली आहे. असे बरेच लोक आहेत ज्यांनी ३०-३५ कसोटी सामने खेळले आहेत आणि तरीही त्यांना पाच शतके झळकावता आलेली नाहीत.”
भारताच्या कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक बळी घेणाऱ्यांच्या यादीत अश्विन आता फक्त अनिल कुंबळे (६१९) आणि कपिल देव (४३४) यांच्या मागे आहे. १३१ कसोटी सामन्यांच्या आपल्या शानदार कारकिर्दीत कपिल यांनी ३१.०५ च्या सरासरीने ५२४८ धावा केल्या होत्या. त्यात आठ शतकांचा समावेश आहे. अश्विनने ८० कसोटीत २७५५ धावा केल्या आहेत.