भारतीय क्रिकेट संघाचा मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर सध्या जोरदार टीकेचा सामना करत आहेत. 20 वर्षांनंतर श्रीलंकेविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत पराभव आणि न्यूझीलंडविरुद्धच्या तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेतील क्लीन स्वीपमुळे त्याच्या कोचिंग शैलीवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. दरम्यान, आता माजी भारतीय क्रिकेटपटू दिनेश कार्तिकनं गंभीरचा बचाव केला. त्याला थोडा वेळ आणि पाठिंबा द्यायला हवा असं कार्तिकनं म्हटलं आहे.
सध्या दक्षिण आफ्रिकेत SAटी20 लीग खेळत असलेला दिनेश कार्तिक ‘क्रिकबझ’शी बोलताना म्हणाला, “गंभीरनं कठीण काळात संघाची जबाबदारी घेतली आहे. राहुल द्रविडच्या यशस्वी कार्यकाळानंतर त्याची जागा घेणं सोपं नाही. संघाला गंभीरच्या कोचिंगशी आणि त्याच्या शैलीशी जुळवून घ्यायला आणखी थोडा वेळ लागेल.”
दिनेश कार्तिक पुढे म्हणाला, “गंभीरनं टी20 क्रिकेटमध्ये तरुण खेळाडूंवर प्रभाव पाडला आहे. पण कसोटी आणि एकदिवसीय सामन्यांमध्ये त्याच्यासाठी परिस्थिती कठीण होत चालली आहे. बांगलादेशविरुद्धच्या मालिकेतील विजयानं सुरुवात चांगली झाली होती, पण त्यानंतर सर्व काही चुकीचं झालं.”
गौतम गंभीरच्या प्रशिक्षणाखाली भारतीय संघानं आतापर्यंत टी20 मध्ये शानदार कामगिरी केली आहे. संघानं अद्याप एकही टी20 मालिका गमावलेली नाही. तथापि, टीम इंडियाला कसोटी आणि एकदिवसीय फॉरमॅटमध्ये आव्हानात्मक काळाचा सामना करावा लागलाय.
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेनंतर गंभीरनं रोहित शर्मा आणि विराट कोहलीच्या भविष्याबाबत विधान केलं होतं. यावर दिनेश कार्तिक म्हणाला, “गंभीरला वाटतं की या खेळाडूंनी त्यांच्यासाठी काय सर्वोत्तम आहे ते स्वतः ठरवावं. गंभीरवरील दबाव वाढत आहे. प्रशिक्षक ड्रेसिंग रूममध्ये चांगलं वातावरण निर्माण करू शकतात, परंतु खेळाडूंना मैदानावर स्वतः आव्हानाचा सामना करावा लागतो”, असं कार्तिकनं शेवटी नमूद केलं.
हेही वाचा –
महाराष्ट्राच्या लेकीनं इतिहास रचला, महिला क्रिकेटमध्ये असं पहिल्यांदाच घडलं!
टी20 मध्ये विराट-रोहितची जागा या खेळाडूंनी घेतली? पाहा आकडेवारी काय सांगते
चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 साठी बांग्लादेशचा संघ जाहीर, 26 वर्षीय खेळाडूची कर्णधारपदी वर्णी