भारताच्या युवराज सिंगनं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वात आधी 6 चेंडूत 6 षटकार ठोकले होते. त्यानं 2007 च्या टी20 विश्वचषकात इंग्लंडच्या स्टुअर्ट ब्रॉडविरुद्ध ही कामगिरी केली होता. त्यानंतर वेस्ट इंडिजच्या कायरन पोलार्डनं श्रीलंकेविरुद्ध हा पराक्रम केला होता. आता नेपाळचा क्रिकेटपटू दीप्रेंद्र सिंह ऐरी यानं ही कामगिरी करून दाखवली आहे.
नेपाळच्या दीप्रेंद्र सिंह ऐरीनं कतार विरुद्ध अवघ्या 21 चेंडूत 64 धावा ठोकल्या. त्यानं आपल्या या तुफानी खेळीत 7 षटकार आणि 3 चौकार हाणले. यामध्ये एका ओव्हरमध्ये 6 षटकारांचा समावेश आहे. यासह दीपेंद्र सिंह ऐरी असा पहिला खेळाडू बनला आहे, ज्यानं आंतरराष्ट्रीय सामन्यामध्ये एका षटकात 6 षटकार लगावण्याशिवाय कमीत कमी एक बळीही घेतला. दीपेंद्र सिंहच्या तुफानी खेळीच्या जोरावर नेपाळनं 20 षटकांत 7 गडी गमावून 210 धावा केल्या.
कतारसाठी शेवटचं षटक टाकण्यासाठी कामरान खान आला. त्याच्या पहिल्या चेंडूवर दीपेंद्र सिंहने लाँग ऑनवर षटकार ठोकला. दीपेंद्र सिंहनं दुसरा चेंडू पॉइंटच्या दिशेवरून बाऊंड्रीबाहेर पाठवला. तिसऱ्या चेंडूवर त्यानं लाँग ऑनवर षटकार ठोकला. यानंतर, चौथा चेंडू जो ऑफ स्टंपच्या बाहेर होता, यावर त्यानं कव्हरवरून षटकार हाणला दीपेंद्रनं पाचव्या चेंडूवर ऑन साइडवरून षटकार मारला. यानंतर त्यानं शेवटच्या चेंडूवर मिडविकेटवर षटकार लगावला.
DIPENDRA SINGH AIREE BECOMES THE THIRD PLAYER TO HIT 6 SIXES IN AN OVER IN T20I HISTORY ⭐🔥 pic.twitter.com/UtxyydP7B0
— Johns. (@CricCrazyJohns) April 13, 2024
दीपेंद्र सिंह ऐरीच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीवर नजर टाकली तर, त्यानं आतापर्यंत 55 एकदिवसीय आणि 57 टी20 सामन्यांमध्ये नेपाळचं प्रतिनिधित्व केलंय. त्यानं टी 20 मध्ये 149.64 चा स्ट्राइक रेट आणि 38.79 च्या सरासरीनं 1474 धावा ठोकल्या आहेत. याशिवाय वनडेमध्ये त्याच्या नावे 19.06 ची सरासरी आणि 71.22 च्या स्ट्राइक रेटनं 896 धावा आहेत.
याशिवाय दीपेंद्र सिंह ऐरीनं गोलंदाजीतही चमकदार कामगिरी केली आहे. त्यानं वनडेमध्ये 3.91 ची इकॉनॉमी आणि 33.39 च्या सरासरीनं 38 बळी घेतले आहेत. तर टी20 मध्ये 6.06 ची इकॉनॉमी आणि 18.75 च्या सरासरीनं 32 फलंदाजांची शिकार केली आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
ना विराट, ना रोहित….ट्रेंट बोल्ट म्हणाला, ‘हा’ भारतीय फलंदाज माझा आवडता