---Advertisement---

नोव्हाक जोकोविचने जिंकले आठवे ऑस्ट्रेलियन ओपनचे विजेतेपद!

On: रविवार, फेब्रुवारी 2, 2020 8:15 PM
---Advertisement---

मेलबर्न। आज(2 फेब्रुवारी) ऑस्ट्रेलियन ओपन 2020मध्ये पुरुष एकेरीचा अंतिम सामना पार पडला. या अंतिम लढतीत सार्बियाच्या नोव्हाक जोकोविचने ऑस्ट्रियाच्या डॉमनिक थीमचा पराभव करत आठव्यांदा ऑस्ट्रेलियन ओपनचे विजेतेपद मिळवले.

3 तास 59 मिनिटे रंगलेल्या या रोमांचकारी अंतिम लढतीत जोकोविचने थीमला 6-4, 4-6, 2-6, 6-3, 6-4 अशा फरकाने पाच सेटमध्ये पराभूत केले. जोकोविचचे हे कारकिर्दीतील एकूण 17 वे ग्रँडस्लॅम विजेतेपद ठरले आहे.

विशेष म्हणजे जोकोविच 8 व्यांदा ऑस्ट्रेलिन ओपनची अंतिम लढत खेळत होता. त्यामुळे त्याने या आठही अंतिम लढतीत विजय मिळवण्याचा पराक्रम केला आहे. त्याने आत्तापर्यंत 2008, 2011,2012,2013, 2015,2016, 2019 आणि 2020 या वर्षी ऑस्ट्रेलियन ओपन स्पर्धा जिंकली आहे.

https://twitter.com/atptour/status/1223958500545458177

आज झालेल्या सामन्यात 32 वर्षीय जोकोविचने पहिला सेट जिंकून शानदार सुरुवात केली होती. पण त्याला नंतर 5 व्या मानांकित थीमकडून कडवी लढत मिळाली. थीमने जोकोविचवर दुसऱ्या आणि तिसऱ्या सेटमध्ये वर्चस्व ठेवले. तिसऱ्या सेटमध्ये तर जोकोविचला केवळ 2 गेम जिंकण्यात यश आले होते.  पण त्यानंतर चौथ्या सेटपूर्वी जोकोविचने मेडिकल ब्रेक घेतला.

त्यानंतर मात्र जोकोविचने थीमला कोणतीच संधी दिली नाही आणि 8व्यांदा ऑस्ट्रेलियन ओपनचे विजेतेपद मिळवण्याच्या दृष्टीने वाटचाल सुरु केली. यामध्ये थीमने थोडीफार लढत देण्याचा प्रयत्न केला. मात्र जोकोविचने अनुभवाच्या जोरावर थीमवर मात केली आणि विजेतेपदावर नाव कोरले.

या लढतीत जोकोविचने नेटजवळ 29 पैकी 24 गुण जिंकले. तसेच 9 बिनतोड सर्व्हिस करत सर्व्हिस वर एकूण 46 गुण जिंकले. त्याचबरोबर थीमने सर्व्हिस परतवून लावताना 134 पैकी 29 गुण जिंकले. मात्र या लढतीत जोकोविच आणि थीम या दोघांनीही प्रत्येकी 57 टाळता येणाऱ्या चुका केल्या. तर प्रत्येकी 5 डबल फॉल्टही केले.

या लढतीनंतर दोन्ही खेळाडूंनी एकमेकांच्या खेळाचे कौतुक केले. तसेच आपपल्या टीमचे आभार मानले.

आता जोकोविच पुन्हा एकदा जागतिक क्रमवारीत राफेल नदालला मागे टाकत अव्वल क्रमांकावर विराजमान होणार आहे.

https://twitter.com/Maha_Sports/status/1223963689163751424

https://twitter.com/Maha_Sports/status/1223942764380819456

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---