भारत आणि इंग्लंड यांच्यातील पहिला कसोटी सामना चेन्नईतील एमए चिदंबरम स्टेडियम येथे खेळवला जात आहे. या सामन्यात इंग्लंड संघाने ४०० धावांची आघाडी घेतली आहे. भारतीय संघाकडून फलंदाजी करतांना ऋषभ पंत याने ९१ धावा, चेतेश्वर पुजारा याने ७३ धावा केल्या तर वॉशिंग्टन सुंदर याने नाबाद ८५ धावांची खेळी केली.
या सामन्यात रोहित शर्मा, अजिंक्य रहाणे आणि शुबमन गिल यांना लौकिकाला साजेशी कामगिरी करता आली नाही. तसेच कर्णधार विराट कोहली याला अवघ्या ११ धावांवर बाद करण्यात इंग्लंडला यश आले. कोहलीला बाद केलेल्या डोमिनिक बेसने आता भारतीय कर्णधाराची विकेट हा आयुष्यातील सगळ्यात मोठा क्षण आहे, अशी प्रतिक्रिया दिली आहे.
“कोहलीला बाद करणे माझ्या आयुष्यातील सर्वात मोठा क्षण”
२३ वर्षीय डोमिनिक बेसने अनुभवी विराट कोहली याच्याविरुद्ध उत्कृष्ट गोलंदाजी केली. विराट कोहली त्याच्या गोलंदाजीवर बचावात्मक क्रिकेट खेळताना दिसून आला. मात्र यात २५व्या षटकाच्या चौथ्या चेंडूवर विराट कोहलीचा बचावात्मक फटका हवेत उडाला आणि शॉर्ट लेगच्या हातात जाऊन विसावला.
याबाबत बोलताना डोमिनिक बेस म्हणाला, “विराट कोहलीला बाद करणे हा क्षण माझ्या आयुष्यातील सर्वात खास क्षण आहे. तो सर्वश्रेष्ठ खेळाडूंपैकी एक आहे. हा खूप खास क्षण आहे. कोहलीला बाद करणे, गोलंदाजी प्रक्रियेचा एक भाग होता. निश्चितच मी त्याला बाद करण्याचा प्रयत्न करत होतो. मी कुठलाच जादूई चेंडू नाही फेकला. फक्त योग्य जागेवर १० ते १५ चेंडू फेकायचे होते. आणि मी ही विकेट मिळाल्याने अतिशय आनंदी आहे.”
बेसची श्रीलंकेविरुद्ध उत्कृष्ट कामगिरी
डोमिनिक बेस याने श्रीलंका संघाविरुद्धसुद्धा उत्कृष्ट गोलंदाजी केली होती. त्याने २ कसोटी सामन्यात सर्वाधिक १२ गडी बाद केले होते. तसेच चेन्नईत सुरू असलेल्या पहिल्या कसोटी सामन्यात इंग्लंड संघाने केलेल्या उत्कृष्ट कामगिरीबाबत बेस म्हणाला की, “आम्ही सर्वश्रेष्ठ प्रदर्शन करत आहोत. मला असे वाटते की, ही आतापर्यंतची सर्वश्रेष्ठ गोलंदाजी आहे. मला वाटत होते की दक्षिण आफ्रिका मध्ये (एक वर्षाआधी) केलेली गोलंदाजी उत्कृष्ट होती. परंतु मी या मालिकेत सुद्धा पूर्ण तयारीसोबत आलो आहे.”
महत्वाच्या बातम्या:
घरासोबत वासेही फिरले! ऑस्ट्रेलियन कर्णधार टीम पेन यष्टिरक्षण सोडून चक्क करतोय गोलंदाजी, पाहा व्हिडिओ
जो रुटची कमाल! १०० कसोटीत केलाय असा कारनामा की गावसकर, सचिन, कॅलिससारख्या दिग्गजांना पडलाय भारी