गुरुवारी(१८ फेब्रुवारी) इंडियन प्रीमियर लीगच्या १४ व्या हंगामाचा लिलाव पार पडला. या लिलावादरम्यान अनेक मोठे विक्रम मो़डीत निघाले. अनेक स्टार विदेशी खेळाडूंना कोट्यावधी रुपयांची बोली लागली. यात ख्रिस मॉरीस, ग्लेन मॅक्सवेल, काईल जेमिसन, जाय रिचर्डसन यांना देखील १४ कोटींहून अधिक रुपयांची बोली लागली. एकीकडे विदेशी खेळाडूंना एवढी मोठी बोली लागत असताना ऑस्ट्रेलियाचा स्टार फलंदाज स्टीव्ह स्मिथला कमी रकमेची बोली लागली, ते पाहून अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला. यात ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार मायकल क्लार्कचाही समावेश आहे.
स्मिथ दिल्ली संघात सामील
आयपीएल २०२१ च्या लिलावात स्टिव्ह स्मिथची मुळ रक्कम २ कोटी इतकी होती. त्यावर त्याला केवळ २० लाख जास्त म्हणजेच २.२० कोटी रुपयांची बोली लावत दिल्ली कॅपिटल्स संघाने आपल्या संघात सामील करुन घेतले. यानंतर दिल्ली संघाने तो त्यांना इतक्या कमी रकमेत मिळाल्याने आनंदही व्यक्त केला.
स्मिथ घेईल आयपीएलमधून माघार – क्लार्क
स्मिथला केवळ २.२० कोटींची बोली लागल्याचे पाहून क्लार्कला आश्चर्य वाटले असून त्याने स्मिथ आयपीएल २०२१ मधून माघार घेऊ शकतो अशी शक्यताही व्यक्त केली आहे.
बीग स्पोर्ट्स ब्रेकफास्ट पॉडकास्टशी बोलताना क्लार्क म्हणाला, ‘तुम्ही स्टीव्ह स्मिथबद्दल बोलत आहात. तो जगातील सर्वोत्तम फलंदाज नसला तरी त्याच्या जवळ आहे. विराट कोहली अव्वल क्रमांकावर आहे, पण स्मिथही पहिल्या ३ मध्ये आहे. मला माहित आहे, त्याच्या अपेक्षेप्रमाणे त्याची टी२० क्रिकेटमधील कामगिरी झालेली नाही. त्याचा मागील आयपीएल हंगामही खास नव्हता.’
क्लार्क पुढे म्हणाला, ‘मी खुप आश्चर्यचकीत झालो की त्याला ४००,००० डॉलरपेक्षाही कमी रक्कम मिळाली, जी खरंतर मोठी रक्कम आहे; पण जेव्हा तुम्ही त्याला मागील हंगामात मिळणाऱ्या रकमेचा विचार करता आणि राजस्थानचा तो कर्णधार होता, असे असताना यंदा आयपीएलसाठी भारतात येण्याआधी त्याच्या मांसपेशींमध्ये ताण आल्यास आश्चर्य वाटू नये.’
‘तो ८ महिने स्पर्धेचे आणि २ आठवड्यांचा क्वारंटाईनचा कालावधी असे ११ महिने त्याच्या पत्नीपासून आणि कुटुंबापासून ३८०,००० डॉलरसाठी दूर राहिल, असे मला वाटत नाही,’ असेही क्लार्क म्हणाला.
साल २०१५ विश्वचषक विजेता कर्णधार क्लार्क पुढे म्हणाला, ‘मी हे पाहण्यास उत्सुक आहे की स्मिथ आयपीएलआधी मांसपेशींमध्ये ताण आल्याचे सांगतो, की त्याला हा टी२० विश्वचषक खेळायचा नसल्याने मी जाणार नाही, असे सांगतो, किंवा त्याला पुढच्या आयपीएलमध्ये आणखी पैसे मिळावेत, असे सांगतो; नाहीतर मग मला पैशाची पर्वा नाही आणि मी जाणार आहे आणि लोकांना चूकीचे सिद्ध करणार आहे, असे सांगतो, हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.’
स्मिथची आयपीएलमधील कामगिरी –
स्मिथने आत्तापर्यंत आयपीएलमध्ये ९५ सामने खेळले असून यात त्याने ३५.३४ च्या सरासरीने २३३३ धावा केल्या आहेत. यात त्याच्या १ शतकाचा आणि ११ अर्धशतकांचा समावेश आहे. तसेच मागच्या हंगामात त्याने १४ सामन्यात ३११ धावा केल्या होत्या. त्याच्या नेतृत्वाखाली मागील हंगामात राजस्थानला फार बरी कामगिरी करता आली नव्हती. राजस्थान संघ गुणतालिकेत तळातील क्रमांकावर राहिला होता.
महत्त्वाच्या बातम्या –
“टॉम आणि जेरी आले एकाच संघात”, आरसीबीच्या ताफ्यात ‘या’ खेळाडूचा समावेश होताच चहलने केले मजेशीर ट्विट
दिल्लीच्या गल्लीत क्रिकेटची सुरुवात केलेल्या विराटचा ‘रनमशिन’ बनण्याचा असा झाला प्रवास