भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यादरम्यान १७ डिसेंबरपासून चार कसोटी सामन्यांच्या बॉर्डर-गावसकर ट्रॉफीला सुरुवात होत आहे. मागच्या दौऱ्यात विजय मिळवलेल्या भारतीय संघासमोर यावेळी काहीसे मोठे आव्हान असणार आहे. मालिका सुरू होण्याआधी झालेल्या दोन सराव सामन्यात भारतीय संघाची कामगिरी उल्लेखनीय राहिली. मात्र, आगामी मालिकेत भारतीय कर्णधार विराट कोहलीला उकसवण्याचा प्रयत्न करू नये, असा सल्ला ऑस्ट्रेलियाच्या मर्यादित षटकांच्या क्रिकेट संघाचा कर्णधार ऍरॉन फिंचने आपल्या संघ सहकाऱ्यांना दिला आहे.
विराटला उकसवू नका
भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यादरम्यान नुकत्याच झालेल्या वनडे व टी२० मालिकेत फिंचने ऑस्ट्रेलियाचे नेतृत्व केले होते. ऑस्ट्रेलियाने वनडे मालिकेत २-१ असा विजय मिळवला होता. तर, टी२० मालिकेत ऑस्ट्रेलिया संघ पराभूत झाला होता. फिंचने ‘सिडनी हेरॉल्ड मॉर्निंग’ ला दिलेल्या मुलाखतीत म्हटले,
“मैदानावर असे प्रसंग येतील जेव्हा तणाव निर्माण होईल. त्यावेळी, संतुलन साधण्याची गरज आहे. कोहलीला उकसवण्याची प्रयत्न केला नाही पाहिजे, कारण असे केल्याने तो विरोधी संघांसाठी धोकादायक ठरू शकतो. विराटच्या स्वभावात पहिल्यापेक्षा अधिक बदल झाला आहे. तो मैदानावर शांत असतो. त्याला खेळाचा चांगला अभ्यास आहे.” फिंच आयपीएल २०२० मध्ये विराट कोहली नेतृत्व करत असलेल्या रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाचा सदस्य होता
विराट परतणार आहे भारतात
भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यातील प्रतिष्ठेची समजली जाणारी बॉर्डर-गावसकर ट्रॉफी ऍडलेड येथील दिवस-रात्र कसोटीने सुरु होईल. या मालिकेत चार सामने खेळविले जातील. पहिला सामना खेळल्यानंतर भारतीय कर्णधार विराट कोहली भारतात परतेल. विराटची पत्नी अनुष्का जानेवारी महिन्यात आपल्या पहिल्या बाळाला जन्म देऊ शकते. त्यासाठी विराटने बीसीसीआयकडे पालकत्व रजा मागितली होती. ती रजा मंजूर झाल्यामुळे विराट भारतात येईल.
संबधित बातम्या:
– पहिल्या कसोटी सामन्यापूर्वी ऑस्ट्रेलिया संघाची घोषणा, या अष्टपैलूला तब्बल ४ वर्षांनंतर स्थान
– अरेरे! कांगारूविरुद्धच्या कसोटी मालिकेत या चार भारतीय खेळाडूंना संधी मिळण्याची शक्यता कमी
– शेन वॉर्नने निवडली पहिल्या कसोटीसाठी ऑस्ट्रेलियाची प्लेइंग इलेव्हन, या खेळाडूंना दिले स्थान