दुलीप ट्रॉफी 2024 च्या दुसऱ्या फेरीच्या सामन्यात श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखाली भारत ड संघाची स्थिती खूपच वाईट आहे. खराब फलंदाजीमुळे संघ या सामन्यात खूप मागे पडला असून त्यांचावर पराभवाची टांगती तलवार आहे. भारत अ संघानं पहिल्या डावात 290 धावा केल्या. प्रत्युत्तरात, भारत ड संघ केवळ 183 धावाच करू शकला. भारत अ संघानं आपल्या दुसऱ्या डावात 1 गडी गमावून 115 धावा केल्या आहेत. दुसऱ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत सलामीवीर प्रथम सिंग 59 धावा करून क्रीझवर राहिला.
खलील अहमद आणि आकिब खानच्या जबरदस्त गोलंदाजीसमोर भारत ड संघाचे फलंदाज केवळ 183 धावांवर गारद झाले. कर्णधार श्रेयस अय्यर 7 चेंडूंचा सामना करून शून्यावर पॅव्हेलियनमध्ये परतला. यानंतर फलंदाजीला आलेल्या संजू सॅमसनलाही विशेष काही करता आलं नाही. त्यानं 6 चेंडूत केवळ 5 धावा केल्या. भारत ड साठी देवदत्त पडिक्कलनं सर्वोत्तम खेळी खेळली. त्यानं 124 चेंडूत 15 चौकारांच्या मदतीनं 92 धावा केल्या. त्याला खालच्या फळीत वेगवान गोलंदाज हर्षित राणानं चांगली साथ दिली. राणानं 29 चेंडूत 4 चौकार आणि 2 षटकारांच्या मदतीनं 31 धावा केल्या. या दोघांच्या फलंदाजीमुळे संघानं 183 धावांपर्यंत मजल मारली. भारत अ संघाकडून खलील अहमद आणि आकिब खान यांनी 3-3 बळी घेतले.
भारत अ संघानं दुसऱ्या डावातही चांगली सुरुवात केली. कर्णधार मयंक अग्रवाल आणि प्रथम सिंग या सलामीच्या जोडीनं पहिल्या विकेटसाठी 115 धावांची शानदार भागीदारी केली. मयंक अग्रवालनं 87 चेंडूत 8 चौकारांच्या मदतीने 56 धावा केल्या. शेवटच्या सत्रात भारत ड संघाचा कर्णधार श्रेयस अय्यरनं त्याची विकेट घेतली. श्रेयसनं गोलंदाजीला येत पहिल्याच चेंडूवर मयंकला पॅव्हेलियनमध्ये धाडलं. दिवसअखेर, प्रथम सिंग 59 धावा करून क्रीजवर आहे.
हेही वाचा –
आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफीत भारत-पाकिस्तान आमनेसामने, कधी आणि कुठे पाहता येणार सामना? जाणून घ्या
आयर्लंडच्या क्रिकेटपटूवर भारतात उपचार, पत्नीमुळे मिळालं दुसरं जीवन
सर्व 11 खेळाडूंनी मिळून फलंदाजाला घेरलं, अशी फिल्डिंग कधी पाहिली का? ; व्हिडिओ व्हायरल