कसोटी क्रिकेटमध्ये फलंदाजावर दबाव टाकण्यासाठी गोलंदाज अनेकदा विविध पर्यायांचा अवलंब करतात. या पद्धती बऱ्याच वेळा प्रभावी ठरल्या आहेत.
नुकतेच, इंग्लंडमध्ये सुरू असलेल्या काउंटी चॅम्पियनशिप 2024 च्या सामन्यातील एका व्हिडिओनं क्रिकेट चाहत्यांना आश्चर्यचकित केलं. या व्हिडिओमध्ये, गोलंदाजी संघाच्या कर्णधारानं शेवटची विकेट मिळविण्यासाठी अवलंबलेली रणनीती चर्चेचा विषय बनली. काउंटी चॅम्पियनशिपमध्ये खेळल्या गेलेल्या सॉमरसेट आणि सरे यांच्यातील सामन्यात शेवटची विकेट घेण्यासाठी सॉमरसेटच्या कर्णधारानं फिल्डिंगमध्ये मोठा बदल केला.
फिरकीपटू जॅक लीच यावेळी गोलंदाजी करत होता. यादरम्यान क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाचे सर्व 11 खेळाडू क्रिजजवळ आले आणि फलंदाजाभोवती उभे राहिले. त्यामुळे दबावाखाली आलेल्या फलंदाज डॅनियल वॉरेलनं आपली विकेट गमावली. विशेष म्हणजे, फलंदाजाभोवती उभे असलेले क्षेत्ररक्षण संघाचे सर्व 11 खेळाडू तुम्ही व्हिडिओच्या एकाच फ्रेममध्ये पाहू शकता. कदाचित अशी घटना कसोटी क्रिकेटमध्ये प्रथमच घडली असेल. असे दृष्य क्रिकेटच्या मैदानावर सहसा पाहायला मिळत नाहीत.
या सामन्यात सॉमरसेटनं 111 धावांनी विजय मिळवला. सामन्यातील सर्वात चर्चेचा विषय ही घटना राहिली. या घटनेचा व्हिडिओ तुम्ही येथे पाहू शकता.
This is absolute art.
The field, the fading light, the celebrations…
— Henry Moeran (@henrymoeranBBC) September 12, 2024
सॉमरसेट आणि सरे यांच्यात खेळल्या गेलेल्या या सामन्यात फिरकी गोलंदाजांचं जबरदस्त वर्चस्व राहिलं. सॉमरसेटसाठी फिरकीपटू जॅक लीच आणि आर्ची वॉन यांनी दोन्ही डावात एकूण 20 बळी घेतले. लीचनं पहिल्या डावात 4 आणि आर्चीनं 6 विकेट घेतल्या. तर दुसऱ्या डावात दोन्ही गोलंदाजांनी प्रत्येकी 5 विकेट घेतल्या.
आर्ची वॉन हा माजी इंग्लिश क्रिकेट खेळाडू मायकेल वॉनचा मुलगा आहे. त्यानं काउंटी चॅम्पियनशिप 2024 मध्ये प्रथम श्रेणी पदार्पण केलं. त्याचबरोबर अनुभवी जॅक लीच इंग्लंडकडून 36 कसोटी सामने खेळला आहे. लीचच्या नावावर त्याच्या आंतरराष्ट्रीय कसोटी कारकिर्दीत 126 विकेट्स आहेत.
हेही वाचा –
बांग्लादेशला हरवण्यासाठी पाकिस्तानचा माजी प्रशिक्षक भारतीय संघात; चेन्नईत जोरदार तयारी
इतिहासातील पहिला व्यक्ती! रोनाल्डोचे सोशल मीडियावर 1 अब्ज फॉलोअर्स पूर्ण!
पाकिस्तानी गोलंदाजाने मोडला भुवनेश्वर कुमारचा ऑलटाइम रेकॉर्ड