इंग्लंडचा फलंदाज जो रूट आता कसोटी क्रिकेटमध्ये जगातील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वाधिक धावा करणारा फलंदाज बनला आहे. या बाबतीत जो रूटने ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पॉन्टिंगला मागे टाकले आहे. जवळपास 13 वर्षे कोणीही हा विक्रम मोडू शकले नाही, पण आता जो रूटने पॉन्टिंगचा विक्रम मोडला आहे. जो रूट आता फक्त क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकरच्या मागे आहे, ज्याने कसोटी क्रिकेटमध्ये 15921 धावा केल्या आहेत, तर जो रूटने केलेल्या धावांची संख्या सध्या 13409 आहे. दुसरीकडे, जेव्हा रिकी पॉन्टिंगने त्याच्या डोळ्यासमोर त्याचा विक्रम मोडताना पाहिला तेव्हा त्याने प्रतिक्रिया दिली आणि जो रूटचे अभिनंदनही केले.
जेव्हा जो रूटने रिकी पॉन्टिंगचा विक्रम मोडला, तेव्हा रिकी पॉन्टिंग मँचेस्टर कसोटी सामन्याच्या तिसऱ्या दिवशी स्काय क्रिकेटवर समालोचन करत होता. यावेळी पॉन्टिंग म्हणाला, “जो रूटचे मनापासून अभिनंदन! खूपच अप्रतिम खेळ केला त्याने. आता तो टेस्ट क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्यांच्या यादीत दुसऱ्या क्रमांकावर पोहोचला आहे. त्याने 120 धावा नाबाद केल्या. ओल्ड ट्रॅफर्ड मैदानावरची ही प्रेक्षकांची समजूतदार आणि क्रीडाप्रेमी गर्दी त्याच्या खेळाचं कौतुक करत आहे. हा एक ऐतिहासिक आणि संस्मरणीय क्षण आहे.” जो रूट सध्या सचिन तेंडुलकरपेक्षा सुमारे 2500 धावा मागे आहे. पण गेल्या चार-पाच वर्षांत जो रूटने ज्या प्रकारे आपल्या कारकिर्दीत सातत्य ठेवून कामगिरी केली आहे, ते पाहता तो हा विक्रम मोडू शकत नाही, असं म्हणण्याचं काहीही कारण नाही!”
मँचेस्टर कसोटी सामन्याच्या तिसऱ्या दिवशी जो रूटने खरोखरच चांगली फलंदाजी केली. या पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेत त्याने आधीच एक शतक झळकावले आहे, तर त्याने हे दुसरे शतक एका महत्त्वाच्या टप्प्यावर खेळले आहे. या सामन्यात त्याने 150 धावा केल्या, तर या मालिकेत त्याच्या धावसंख्येने 400 चा टप्पा ओलांडला आहे. या सामन्यापूर्वी तो कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत पाचव्या क्रमांकावर होता, पण आता तो दुसऱ्या क्रमांकावर आहे. रिकी पॉन्टिंग व्यतिरिक्त त्याने जॅक कॅलिस आणि राहुल द्रविड यांचेही विक्रम मोडले आहेत.






